esakal | Vidhansabha2019 : चंदगडमधून 'यांना' उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhansabha2019 : चंदगडमधून 'यांना' उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

Vidhansabha2019 : चंदगडमधून 'यांना' उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज - कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकांत व्यूहरचना आखण्यात तरबेज मानले जाणारे राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वत:च्या कागल आणि शेजारच्या चंदगड मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवून आहेत. चंदगडमधील राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेत राष्ट्रवादीचे पर्यायी उमेदवार म्हणून राजेश नरसिंगराव पाटील यांची मानसिकता तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

पाटील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे नातेवाईक असून, त्यांच्याच माध्यमातून राजेश यांना राष्ट्रवादीत घेवून रिंगणात उतरवण्याच्या हालचालींना वेग आल्याचे चित्र आहे. एकीकडे चंदगडमधून राजेश यांच्या माध्यमातून पक्षाला पर्यायी उमेदवार देत प्रश्‍न निकाली काढायचा आणि दुसऱ्या बाजूला कागलमध्ये प्रा. मंडलिक यांचे सहकार्य घ्यायचे असा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे. 

डॉ. बाभूळकर भाजपमध्ये "जाणार...जाणार' अशी अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. परंतु, आजअखेर या चर्चेवर डॉ. बाभूळकर किंवा आमदार कुपेकर यांनी दुजोराही दिला नाही आणि स्पष्टपणे नकारही दिलेला नाही. यामुळे बिकट परिस्थिती तयार झाल्याने चंदगडमधून राष्ट्रवादीचा पर्यायी उमेदवार शोधून ठेवण्याचे काम पक्ष पातळीवर सुरू आहे. या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार कोण द्यायचा, याचे कोडेही नेत्यांना पडले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी धावपळ करण्यापेक्षा आतापासूनच उमेदवार शोधण्यासाठी मुश्रीफ यांच्याकडून प्राधान्य दिले जात असल्याचे समजते. दरम्यान, कै. नरसिंगराव पाटील यांचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जवळीकतचे संबंध होते. हे संबंध राजेश यांनीही टिकवून ठेवले आहेत. त्यातच खासदार प्रा. मंडलिक व राजेश हे निकटचे नातेवाईक आहेत. यामुळे प्रा. मंडलिक यांच्या माध्यमातून राजेश यांना राष्ट्रवादीचे पर्यायी उमेदवार म्हणून तयार करण्यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. 

मंडलिकांचा सहभाग कितपत ? 
चंदगड मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या निर्णयात प्रा. मंडलिक यांचा सहभाग कितपत, हा प्रश्‍न आहे. चंदगड व कागल हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहेत. स्वत: प्रा. मंडलिक शिवसेनेचे खासदार आहेत. यामुळे या साऱ्या चर्चेत प्रा. मंडलिक कितपत भाग घेणार, याविषयी अजूनतरी साशंकताच आहे. 
 

 
 

loading image
go to top