Vidhansabha 2019 : भाजपच्या चंचुप्रवेशाची शक्‍यता

अभय दिवाणजी
गुरुवार, 16 मे 2019

असे आहे राजकीय चित्र 

  • मोहिते-पाटील यांच्यामुळे राजकारणाला नवे आयाम 
  • लोकसभा मतदारसंघात भाजपच्या ताकदीत वाढ 
  • वयाच्या ९४व्या वर्षीही गणपतराव देशमुख प्रचारात 
  • करमाळ्यात नवा संघर्ष, नव्या समीकरणाची जुळणी 
  • माळशिरसमधील बदलत्या राजकीय समीकरणाकडे लक्ष 

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात मुसंडीचा प्रयत्न भाजपने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने केलाय. विधानसभेसाठी भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढल्याने निवडणुका चुरशीच्या होतील.

राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील; तर माण-खटाव व फलटण अशा सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांकडे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांतील नेत्यांचे लक्ष लागले आहे.

मोदी लाटेतही गड कायम राखलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला. सहापैकी एकाही विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रतिनिधी नाही. त्यामुळे त्यांच्या सहकार्याने आगामी निवडणुकीत भाजपला या भागात चंचूप्रवेश करता येईल का, यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करतील. सध्या सांगोल्यात शेकाप, करमाळ्यात शिवसेना; माढा, माळशिरस व फलटणमध्ये राष्ट्रवादी; तर माण-खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत. भाजपकडे इच्छुकांच्या संख्येत वाढच होत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळ्यातून नारायण पाटील (शिवसेना), रश्‍मी बागल (राष्ट्रवादी) आणि संजय शिंदे (स्वाभिमानी शेतकरी संघटना) यांच्यातील जोरदार लढतीत पाटील यांचा निसटता विजय झाला. भाजप-शिवसेनेची युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहील. सीना-माढा जोड कालव्याद्वारे केलेल्या सिंचन विकासामुळे माढा मतदारसंघात पाच टर्मपासून बबनदादा शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. शिवसेनेकडून पारंपरिक विरोधक शिवाजी सावंत यांची लढत असते. येथून यंदा मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. 

सांगोला मतदारसंघातून अपवाद वगळता दहा निवडणुकीत गणपतराव देशमुख (शेकाप) विजयी झालेत. वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षीही या वेळी ते रिंगणात असतील. पारंपरिक विरोधक शहाजीबापू पाटील अथवा श्रीकांत देशमुख यांच्याशी लढतीची शक्‍यता आहे. पाटील यांनी १९९५ मध्ये काँग्रेसकडून लढत विजयश्री खेचून आणली होती. गणपतराव देशमुखांची मतदारसंघावर पकड घट्ट आहे. ते जर रिंगणात नसतील, तर राष्ट्रवादीकडून दीपक साळुंके निवडणूक लढवतील. मोहिते-पाटील कुटुंबीयांच्या आशीवार्दाने माळशिरस मतदारसंघात राष्ट्रवादीचे (कै.) हणमंत डोळस यांनी दोनदा यश मिळविले. या आरक्षित मतदारसंघातून विरोधकांकडे ताकदीचा उमेदवारच नाही. 

यंदा या ठिकाणी समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे, अजय सकट, राम सातपुते, मोहन लोंढे, बाळासाहेब धाईंजे यांच्या नावांची चर्चा आहे. मोहिते-पाटील यांच्या आशीर्वादाने मतदारसंघात भाजपचा चंचूप्रवेश होईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खेळीने गळाला लागलेल्या गोरे बंधूंनी फलटण आणि माण-खटावमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना सहकार्य केले. परंतु त्यांनी अधिकृत पक्षप्रवेश केलेला नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जाहीर सभेत शेखर गोरे यांनी व्यासपीठावर गोंधळ घातला. त्यांची मोठी चर्चा झाली. संजय शिंदे यांच्या समविचारी गटामध्ये जयकुमार गोरे सक्रीय सदस्य होते. शिंदे यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढविताना समविचारातील गोरे यांच्यासह अन्य सहकारी विरोधात होते. 

माण-खटावमधून राष्ट्रवादीकडून निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचीही चर्चा आहे. लोकसभेला त्यांनी जोरदार तयारी केली होती. ऐनवेळच्या घडामोडींत त्यांना बाजूला व्हावे लागले. फलटण मतदारसंघ राखीव झाला, तरीही रामराजे नाईक निंबाळकर यांची पकड मजबूत आहे. येथून तिसऱ्यांदा आमदार दीपक चव्हाण मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे.

असे आहेत पक्षनिहाय इच्छुक 
भाजप - मोहिते-पाटील (कुटुंबातील सदस्य), शहाजी पाटील, श्रीकांत देशमुख, राजश्री नागणे, अजय सकट, राम सातपुते, दिलीप कांबळे, मोहन लोंढे, बाळासाहेब धाईंजे, प्रा. सुनंदा काटे, राजेश गुजर, संजय कोकाटे, दादासाहेब साठे, गणेश चिवटे, जयकुमार गोरे किंवा शेखर गोरे, दिलीप येळगावकर. 

शिवसेना - नारायण पाटील, शिवाजी सावंत. 

राष्ट्रवादी-काँग्रेस (आघाडी) - बबनराव शिंदे, रणजितसिंह शिंदे, रश्‍मी बागल, चंद्रकांत सरडे, प्रभाकर देशमुख, दीपक साळुंके, दीपक चव्हाण, पी. सी. झपके. 
 

वंचित आघाडी - शिवाजी कांबळे, दशरथ कांबळे.

Web Title: Vidhansabha Election 2019 Madha Constituency BJP NCP Congress Politics