Vidhansabha 2019 : स्वाभिमानी, वंचित आघाडीचा प्रभाव

Sangli-Vidhansabha
Sangli-Vidhansabha

सांगली लोकसभा मतदारसंघास आता भाजपने मतपेढी बनवलीय. आयात नेते भाजपमय झालेत. जिल्हा परिषद, महापलिका ताब्यात घेत त्यांनी बलाढ्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केलंय. काँग्रेसला तर लोकसभेची जागादेखील ‘स्वाभिमानी’साठी सोडावी लागली. अर्थात, लाटेवर स्वार भाजपला लोकसभेसाठी कसरत करावी लागलीच. स्वाभिमानी आणि ‘वंचित’मुळे भविष्यात गणिते बदलू शकतील, असे तर्क मांडले जाताहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजप, स्वाभिमानी आणि वंचित असा तिरंगी सामना झाला. वसंतदादा पाटील घराणे प्रथमच काँग्रेसच्या चिन्हाशिवाय दुसऱ्या पक्षाकडून लढले. तरुण उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपच्या संजय पाटलांसमोर कडवे आव्हान उभे करत मरगळलेल्या काँग्रेसमध्ये जाण आणली. काँग्रेसचा भविष्यात जिल्ह्याचा नेता कोण हेदेखील ही निवडणूक ठरवेल. त्याचबरोबर वंचित आघाडीचा फॅक्‍टरही जिल्ह्यात गोपीचंद पडळकरांमुळे पुढे आला. या सर्वांचे परिणाम विधानसभा निवडणुकीत नक्की दिसतील. मतदारसंघातील सहापैकी तीन मतदारसंघात भाजप, तर उर्वरित तीनमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार आहेत. वंचित आघाडीही आव्हान उभे करू शकते. 

सांगली विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळी सुधीर गाडगीळ जायंट किलर ठरले. या वेळी काँग्रेसकडून कोणाला मैदानात उतरावयाचे याबाबत अद्याप निश्‍चित धोरण नाही. जयश्रीताई पाटील या काँग्रेसकडून प्रमुख दावेदार ठरू शकतील. 

राखीव मिरज मतदारसंघात भाजपचे सुरेश खाडे यांच्यासमोर कोण हे स्पष्ट नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरणे शक्‍य आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत आर. आर. पाटील विजयी झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमन पाटील आमदार झाल्या. तासगावचे भाजप नेते संजय पाटील विद्यमान खासदार आहेत. या मतदारसंघात आर. आर. गट आणि संजय पाटील गट प्रभावी आहे. भाजपचे कवठेमहांकाळचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे हे भाजपचे उमेदवार असतील. जत तालुक्‍यात भाजपकडून आमदार विलासराव जगताप यांची उमेदवारी निश्‍चित असेल. भाजपमध्ये बंडाचे संकेत आहेत. काँग्रेसकडून विक्रम सावंत प्रबळ दावेदार असतील.

पलूस-कडेगाव मतदारसंघ पतंगराव कदम यांचा. पतंगरावांचे प्रचारात नसणे काँग्रेसला जिल्ह्यात कमतरता भासवणारे ठरले. त्यांचे पुत्र आमदार विश्‍वजित हेच काँग्रेसतर्फे मैदानात असतील, त्यांच्यासमोर भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे आव्हान असेल. खानापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. आमदार अनिल बाबर यांनी दुष्काळी भागाला सिंचन योजनांचे बळ देऊन आव्हान कायम ठेवलंय. काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याशी त्यांची लढत होईल. येथे वंचित आघाडीचेही आव्हान असेल. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फॅक्‍टरही महत्त्वाचा असेल. त्यांचा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हातकणंगले मतदारसंघात येतो. या वेळी त्यांची राजू शेट्टींशी गट्टी जमल्याने  समीकरणे बदललीत. जयंत पाटील यांचा हस्तक्षेप सांगली, मिरज, जत या मतदारसंघांत निकाल बदलू शकतो.

पक्षनिहाय चर्चेतील इच्छुकांची नावे
भाजप - सुरेश खाडे, विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, राजेंद्रअण्णा देशमुख, निशिकांत पाटील, संग्रामसिंह देशमुख, दिनकर पाटील, डॉ. रवींद्र आरळी, तम्मनगौडा रविपाटील, सम्राट महाडिक.

काँग्रेस - विश्‍वजित कदम, सदाशिवराव पाटील, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, सत्यजित देशमुख, विक्रम सावंत, प्रा. सिद्धार्थ जाधव, ॲड. सी. आर. सांगलीकर, आनंदराव डावरे.

राष्ट्रवादी - जयंत पाटील, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, अरुण लाड, बाळासाहेब होनमोरे.
 

शिवसेना - अनिल बाबर, शेखर माने, संजय विभुते, आनंदराव पवार, दिगंबर जाधव, तानाजीराव सातपुते.

वंचित आघाडी - ब्रह्मदेव पडळकर, जयसिंग शेंडगे, प्रकाश शेंडगे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com