Vidhansabha 2019 : उंडाळकर गटापुढे आमदारकीचे ‘लक्ष्य’

Vilasrao-Udaysinh
Vilasrao-Udaysinh

विलासरावांचा विधानसभा लढण्याचा निर्धार, तर उदयसिंहांनी धनुष्य उचलल्याचे निमित्त!
कऱ्हाड - मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटात तब्बल ३५ वर्षांनंतर मनोमिलन झालेले असतानाही ‘रयत संघटने’च्या माध्यमातून कऱ्हाड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढवण्याचा विलासराव उंडाळकरांनी केलेला निर्धार, त्यांचे पुत्र युवा नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी स्पर्धेच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने हाती घेतलेले ‘धनुष्य’ याचा संदर्भ घेऊन राजकीय वर्तुळात सध्या उंडाळकर गटाच्या भूमिकेबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगवेगळे असतात. त्याचे प्रत्यंतर दरवेळी कऱ्हाड दक्षिण विधानसभा निवडणुकीत दिसून आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतोय ना बसतोय तोच सध्या आगामी विधानसभेसाठी इच्छुकांनी व्यूहरचना सुरू केली आहे. कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे तब्बल ३५ वर्षे माजी मंत्री उंडाळकर यांनी नेतृत्व केले. त्यांनी पहिल्यापासून काँग्रेसच्या विचारधारेवर वाटचाल केली. त्यांना पक्षाचे तिकीट मिळवण्यात अनेकदा अडचणी आल्या. मात्र, त्यावर मात करत त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले. त्यामुळेच ते सात वेळा आमदार म्हणून निवडून आले. मागील निवडणुकीत त्यांना तिकीट मिळाले नाही. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाड दक्षिणमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यामुळे उंडाळकर यांना अपक्ष लढावे लागले. त्यादरम्यान त्यांना इतर पक्षांच्या ऑफर असतानाही त्यांनी त्या डावलून अपक्ष लढण्याचा निर्धार करत निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, रयत संघटना जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी आजअखेर शर्तीचे प्रयत्न केले आहेत. मध्यंतरी मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण आणि माजी मंत्री उंडाळकर यांचे पुत्र युवा नेते ॲड. उदयसिंह पाटील यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येत तेथे सत्ता मिळवली. यानिमित्ताने गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ चव्हाण आणि उंडाळकर गटात असलेले वैरत्व संपून मनोमिलन घडण्यात यश आले. त्या निवडणुकीचा आधार घेऊन अनेक ग्रामपंचायतींतही चव्हाण आणि उंडाळकर गटांची सत्ता आली.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे संबंधित रिक्त झालेल्या जागेवर ॲड. पाटील यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण्याबाबत मध्यंतरी चर्चा सुरू होत्या. मात्र, त्याचाही निर्णय अजूनही गुलदस्त्यातच राहिला आहे. त्यावर श्री. चव्हाण यांनी कालच जिल्हाध्यक्ष होण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र, पक्षाचे कामच कोणी करत नाही, अशी टिप्पणी करून तेथे कार्यकारी अध्यक्ष नेमणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तेथे कोणाची वर्णी लागेल, हेही स्पष्ट नाही. त्यामुळे उंडाळकर गटाने पुन्हा सवतासुभा करून विधानसभेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. उंडाळकर यांनी काल त्यासंदर्भात केलेल्या सूचक वक्तव्यातून त्याची प्रचिती येते. त्यातच कऱ्हाड येथील एका स्पर्धेच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने उदयसिंह पाटील यांनी धनुष्य हातात घेतले.

त्याचाच संदर्भ घेऊन सध्या राजकीय वर्तुळात उंडाळकर गटाच्या भूमिकेबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ॲड. पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आगामी काळात शिवसेनेचे ‘धनुष्य’ उचलतील, अशीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी विधानसभा तोंडावर असतानाच उंडाळकर गट सध्या जोरदार चर्चेत आला असून, उंडाळकर गट कोणता निर्णय घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com