मजबूत संघटन हीच भाजपची ताकद - पुराणिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

सांगली - प्रत्येक गावापर्यंत जाऊन तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून केलेले मजबूत संघटन हीच भाजपची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गोष्ट जाहीरपणे सांगितलीय. या बळावरच विधानसभेला पुन्हा आपण ताकद दाखवू, असा विश्‍वास भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी व्यक्त केला. 

सांगली - प्रत्येक गावापर्यंत जाऊन तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून केलेले मजबूत संघटन हीच भाजपची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गोष्ट जाहीरपणे सांगितलीय. या बळावरच विधानसभेला पुन्हा आपण ताकद दाखवू, असा विश्‍वास भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी व्यक्त केला. 

जिल्हा भाजपतर्फे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील टिळक स्मारक मंदिरात झाला. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. पुराणिक म्हणाले,‘‘देशात भाजपने सर्वत्र मिळवलेल्या विजयाचे श्रेय आपल्या संघटनात आहे. त्यासाठी त्या गोष्टीला विशेष प्राधान्य द्या. सत्ता आल्यावर पक्षातील लोक सत्तेत मश्‍गुल होतात. भाजप त्याला अपवाद ठरला. २०१४ च्या विजयानंतर एका बाजूला विकासाला वेग मिळाला आणि दुसऱ्या बाजूला संघटनही मजबूत करण्यात आले. विधानसभेला तीच आपली ताकद ठरेल. बूथ मजबूत करा.’’

श्री. खाडे म्हणाले,‘‘जिल्ह्यातील लोकांनी अत्यंत विश्‍वासाने भाजप युतीला साथ दिली. भाजपचे चार आणि शिवसेनेचा एक आमदार विधानसभेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आठही मतदार संघात युतीचे उमेदवार निवडून आणू. कधीकाळी हा गड वसंतदादांचा होता. तेथे जतमध्ये पहिल्यांदा कमळ फुलवले. त्यानंतर एकचे तीन आमदार झाले. भाजपचे खासदार झाले. चार आमदार आणि आता एक मंत्रीपद मिळाले. लोकांनी दाखवलेला हा विश्‍वास मोठा आहे. आगामी निवडणूकीत त्या बळावर आपण आठही मतदार संघात युतीचे उमेदवार निवडून आणू.’’

खासदार पाटील म्हणाले, ‘‘सारे एकजुटीने जिल्ह्याचा विकासाला गती देऊ.’’  सरचिटणीस सुरेंद्र चौगुले यांनी निवेदन केले. डॉ. आरळी यांनी आभार मानले.  

जिल्हाध्यक्ष, आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले,‘‘पक्षाची नवीन मतदार नोंदणी वाढण्यावर भर द्या. अन्य पक्ष त्यात पुढे आहेत. आपण शिथिलता सोडून द्यावी. राज्यात सांगली नंबर वन जिल्हा झाला पाहिजे. शक्तीकेंद्र, बूथ, विस्तारक या सर्व यंत्रणा महत्वाच्या आहेत. दिवस कमी आहेत. गांभिर्याने काम सुरु करावे.’’

प्रकाश बिरजे, विक्रम पाटील, मिलिंद कोरे, मुन्ना कुरणे, श्रीपाद अष्टेकर, सभापती मंदाताई करांडे, सीमा मांगलेकर, हर्षवर्धन देशमुख, जि. प. सभापती तम्मनगौडा रविपाटील, सदस्य सुरेंद्र वाळवेकर, सरदार पाटील, प्रमोद शेंडगे, शांता कनुंजे, शोभा कांबळे, प्राजक्ता कोरे, नगरसेवक भारती दिगडे आदी उपस्थित होते. 

काकांना मंत्री करा
पृथ्वीराज देशमुख यांनी श्री. पुराणिक यांच्याकडे संजयकाकांना मंत्री करा, अशी मागणी केली. नीता केळकर यांनी जिल्ह्यात आधी तीन मंत्री होते. आता एकच आहे, याची आठवण करून दिली. त्यावर देशमुख म्हणाले,‘‘एक नाही, दोन मंत्री आहेत. सदाभाऊ आहेत की! आता केंद्रात एकमंत्रीपद द्या. संजयकाकांना मंत्री करा.’’

यावेळी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजप नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर, नीता केळकर, शेखर इनामदार, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले, डॉ. रवींद्र आरळी आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Puranik comment