ऐन पावसाळ्यात एरंडोलीतील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित 

भाऊसाहेब मोहिते 
Wednesday, 30 September 2020

कोट्यवधी रुपये खर्च होऊनही एरंडोलीचे ग्रामस्थ ऐन पावसाळ्यात पाण्यापासून वंचित आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हजारो ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे.

एरंडोली : कोट्यवधी रुपये खर्च होऊनही एरंडोलीचे ग्रामस्थ ऐन पावसाळ्यात पाण्यापासून वंचित आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हजारो ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने 2011मध्ये एरंडोली गावासाठी दीड कोटी रुपयांची योजना मंजूर केली. ठेकेदार आणि आधिकाऱ्यांच्या खाबुगिरीमुळे या योजनेचे काम झाले नाही. या घोटाळ्याची अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी चौकशी करून कारवाईचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिला असला तरी त्यामध्ये ठेकेदार आणि आधिका-यांवर अत्यंत जुजबी जबाबदारी निश्‍चित करून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. 

पाणी पुरवठा योजनेचे कामच झाले नसल्याने गेल्या महिन्याभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला दाहीदिशा भटकंती करावी लागते आहे. या योजनेतील गैरकारभार व भ्रष्टाचाराबद्दल फक्त अध्यक्ष व सचिव यांनाच जबाबदार धरण्यात आल्याने योजनेच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात यावे यासाठी मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत बराच गोंधळ झाला. 

गावासाठी सुमारे तीस वर्षांपूर्वी स्थानिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. मात्र या योजनेचे पाणी कमी पडू लागल्याने राष्ट्रीय पेयजल योजनेतून काम करण्यात आले. सध्या राज्य मार्गाचे काम चालू असल्याने योजनेची पाईपलाईन किमान 20 ठिकाणी फुटली आहे. या फुटलेल्या पाईपलाईनचे लिकेज काढून गावासाठी पाणीपुरवठा करणे अशक्‍य असल्याने नवीन पाईपलाईन करूनच पाणीपुरवठा करावा लागणार आहे यामुळे एरंडोलीकरांना अजुन किती दिवस शुद्ध पाण्यासाठी वाट पहावी लागणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सार्वजनिक पाटबंधारे विभाग व ठेकेदार यांच्या संपर्कात असून लवकरच स्थानिक योजनेच्या पाण्यांचे काम पूर्ण करू. 
- शिदगोंडा विटेकर, ग्रामविकास अधिकारी 

राष्ट्रीय पेयजल योजना चाचणी पासूनच अपयशी ठरल्याने संपूर्ण योजनाच परत राबवावी व झालेला खर्च संबंधितांकडून व्याजासह वसूल करावा. 
- सुभाष साळुंके

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers in Erandoli are deprived of water

फोटो गॅलरी