रस्त्यासाठी महिला-मुलांसह ग्रामस्थ रस्त्यावर 

गजानन बाबर
Wednesday, 12 August 2020

अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी अखेर महिला व मुलांसह ग्रामस्थांना रस्त्यावर येणे भाग पडले.

विटा : अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या रस्त्याची समस्या सोडवण्यासाठी अखेर महिला व मुलांसह ग्रामस्थांना रस्त्यावर येणे भाग पडले.पावसाची पर्वा न करता 35 किलोमीटर टाळ वाजवत पायी चालत जाऊन तहसील कार्यालय विटा येथे धरणे आंदोलन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारी करंजे ग्रामस्थांकडून करण्यात आली. टाळ वाजवत पायी निघालेल्या आबालवृद्धांच्या या आंदोलनाला दिंडीचे रूप प्राप्त झाले. 

प्रहार जनशक्ती पक्ष,अखिल भारतीय किसान सभा व शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करंजे ते विटा टाळकरी लॉंगमार्च काढण्यात आला.गेली सत्तर वर्षे रस्त्यासाठी झगडूनही हक्काचा रस्ता मिळत नसल्याने करंजे ग्रामस्थांना घेवून करंजे ते विटा टाळकरी लॉंगमार्च निघाला आहे.या टाळकरी लॉंगमार्चमध्ये बारा-तेरा वर्षाच्या मुलांपासून सत्तर वर्षांचे वयोवृध्द लोकही सामिल झाले आहेत.

करंज्यातून महिला व मुलांसह ग्रामस्थ रस्त्यासाठी निघाले आहेत.करंजे बसस्थानक येथून निघाल्यानंतर रेवणगाव येथील गुरूकृपा मंगलकार्यालयात मुक्काम करण्यात येईल.बुधवारी सकाळी रेवणगाव येथून निघाल्यानंतर हा लॉंगमार्च विटा तहसिल कार्यालयासमोर येईल व तिथेच बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. रस्ता मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार करत हा टाळकरी लॉंगमार्च सुरू झाला. किसान सभेचे कॉम्रेड उमेश देशमुख,प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्कप्रमुख दत्तकुमार खंडागळे,किसान सभेचे गोपिनाथ सुर्यवंशी, भाई भानुदास सुर्यवंशी,अँड.विजय सुर्यंवशी आणि करंजे ग्रामस्थ या मोर्चात सहभागी झाले आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers on the streets with women-children for the road