उजनी परिसरातील गावे कोरडीच 

ujani
ujani

सोलापूर : सोलापूर शहरासह पुणे व कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या उजनी धरण परिसरातील गावे अद्यापही कोरडीच आहेत. बॅकवॉटरपासून काही अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्‍यातील गावांमध्ये कायमस्वरूपी पाणी देण्यात सरकारला यश आलेले नाही. पावसाळा संपला की पाणीटंचाईला नागरिकांना सामोर जावे लागते. यंदा कमी पाऊस पडल्याने दुष्काळजन्य स्थिती आहे.

अनेक ठिकाणी पेरणीसुद्धा झालेली नाही. आज बुधवारी (ता. 5) ४ वाजता केंद्राचे पथक पाहणीसाठी जिल्ह्यात (करमाळा तालुक्यात) येत आहे. "अडचण हे विकासाचे द्वार' समजून यातून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर भीमा नदीवर माढा तालुक्‍यातील भीमानगर येथे उजनी धरण आहे. याची पाणी साठवण क्षमता 117 टीएमसी आहे. नियोजनाच्या अभावामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवते. सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या निम्म्यापेक्षा कमी म्हणजे केवळ 36 टक्के पाऊस झाला. तरी सुद्धा पुणे जिल्ह्यातील पावसामुळे हे धरण भरले. यासाठी करमाळा तालुक्‍यातील सर्वांत जास्त गावांनी त्याग केला आहे. 19 गावे यात पूर्णतः उद्‌धवस्त झाली तर 26 गावे बाधित झाली आहेत. मात्र, बॅकवॉटरपासून काही अंतरावर असलेल्या गावांना सुद्धा याचा सिंचनासाठी उपयोग झालेला नाही. ज्या गावांमध्ये फुगवट्याचे पाणी आले आहे त्याच पाण्यावर नागरिकांची भिस्त आहे.

काही शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन स्वखर्चाने पाइपलाइन केल्या आहेत. उजनी बॅकवॉटरपासून केवळ 10 ते 15 किलोमीटरवर असलेल्या फोफळज, जेऊर, जेऊरवाडी, कुंभेज, कोंडेज, झरे, अंजनडोड, वीट, मोरवड, विहाळ, रोशेवाडी, पिंपळवाडी, राजुरी, सावडी, कोर्टी, देवळाली या गावांचा भाग कोरडा आहे. माढा तालुक्‍यातीलही फक्त काही गावांनाच याचा उपयोग होतो आहे. या भागातील क्षेत्र कायम ओलिताखाली यावे म्हणून सिंचनाच्या योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची गरज आहे. दहिगाव उपसा सिंचन यंदा सुरू झाली आहे. दुष्काळात ती कायम सुरू राहिली तर योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांना पिण्यासाठी पाणी मिळू शकेल. त्यामुळे जनावरांना चारासुद्धा उपलब्ध होणार आहे. 

सीनेकाठच्या गावात कायम टंचाई 
तालुक्‍यातील सीना नदीच्या काठावर असलेल्या खडकी, आळजापूर, तरटगाव, बिटरगाव (श्री), बाळेवाडी, पोटेगाव, निलज या गावांमध्ये कायम पाणीटंचाई असते. सीना नदीवर संगोबा, पोटेगाव, तरटगाव व खडकी येथे बंधारे आहेत. मात्र ते कोरडेच असतात. यावर्षी नदीला एखदाही पाणी आले नाही. ज्वारीची पेरणी झालेली नाही. त्यामुळे चारा टंचाई जाणवत आहे. कुकडेचे पाणी मांगी तलावात आल्यास बऱ्यापैकी भाग ओलिताखाली येईल. मांगी तलावातून आलेल्या चारीचे काम पूर्ण करावे व कुकडीचे पाणी बंधाऱ्यात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. 

रोजगार हमीची कामे 
दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात रोजगार हमीची त्वरित कामे सुरू करावीत अशी मागणी केली जात आहे. पेरणी न झाल्याने नागरिकांच्या हाताला काम नाही, त्यामुळे घरखर्च भागवणे अवघड झाले आहे. 

उजनी धरणातून 200 किलोमीटरवर मराठवाड्याला पाणी नेण्याचे काम सुरू आहे. मात्र, या धरणात सर्वांत जास्त त्याग केलेली गावांना अद्याप पाणी मिळालेले नाही. तालुक्‍यातील अनेक गावांत अद्याप उजनीचे पाणी पोचले नाही. त्यात दुसरीकडे पाणी नेणे हा विरोधाभास आहे. हे काम त्वरित थांबवून जिल्ह्यातील व करमाळा तालुक्‍यातील गावांना पाणी द्यावे. 
- सुभाष इंगोले, शेतकरी, करमाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com