विनायक पाटील गजाआड; इतर मोकळेच

विनायक पाटील गजाआड; इतर मोकळेच

कोल्हापूर  - रोजगार हमी योजनेतील रोपे संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) तयार केल्याचे दाखवून २ लाख २१ हजार ४००  रुपयांच्या अपहारप्रकरणी वनपाल विनायक नाना पाटील (राशिवडे खुर्द, ता. राधानगरी, सध्या शाहूवाडी शासकीय निवासस्थान) याला अटक करून गुरुवार (ता. १४) पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याच प्रकरणात सहआरोपी असणाऱ्या वनसंरक्षक अमृता कांबळे यांना अटक केली जाणार आहे.

दरम्यान, पाटीलला अटक झाल्यानंतर कांबळे यांचाही शोध सुरू झाला आहे. याच प्रकरणात दोषी असणाऱ्या वनक्षेत्रपालांवरही कारवाई होणे अपेक्षित आहे. 

जिल्हा उपवनसंरक्षक श्री. धुमाळ यांच्या आदेशानुसार मलकापूर वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी हा गुन्हा नोंद केला. ‘सकाळ’मधून वन विभागातील हा अपहार उजेडात आणला होता. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी झाली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मौजे मोसम व घुंगूर (ता. शाहूवाडी) येथे १ लाख २० हजार वृक्षांची रोपवाटिका तयार केली होती. याच रोपवाटिकेतील रोजगार हमी योजनेत तयार केलेली १५ हजार रोपे संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (जेएफएम) तयार केल्याचे दाखवून हा घोटाळा केला होता.

शासनाकडून चार कोटी वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सर्वसामान्य लोक स्वत: खर्च करून वृक्ष लागवड करताना दिसतात. या ठिकाणी शासनाने दिलेला निधी वृक्ष लागवडीसाठी खर्च न करता तो थेट स्वत:च्या खिशात घालण्याचे काम वनक्षेत्रपाल, वनपाल आणि वनसंरक्षकांनी केले आहे. 

यामध्ये वनपाल विनायक पाटील याच्यावर गुन्हा नोंद झाला. त्यानंतर गुरुवारी (ता. ७) त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, वनसंरक्षक म्हणून काम करणाऱ्या महिला अधिकारी अमृता कांबळे यांनाही या प्रकरणात सहआरोपी केले आहे. त्यांच्यावरही त्याच तत्परतेने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. तर, या दोन्ही अधिकाऱ्यांच्या कारभाराला डोळेझाकपणे मंजुरी देणारे वनक्षेत्रपाल  जेरे हे मात्र या कारवाईपासून अलिप्त आहेत. ऑगस्टमध्ये पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली. आता मलकापूर पोलिसांनी ज्याप्रमाणे विनायक पाटीलवर कारवाई केली, त्यानुसार अमृता कांबळेंसह इतर दोषींवरही कारवाई करावी लागणार आहे. 

‘सकाळ’मधील वृत्तानंतर कारवाई
वृक्ष लागवडीसाठी सरकार आणि वन विभागाने दिलेला २ लाख २० हजार ९०० रुपयांचा निधी पेंडाखळे वनक्षेत्रपाल, पेंडाखळे वनपाल आणि नांदगाव वनरक्षकांच्या सहीने इतर लोकांच्या खात्यावर वर्ग केला आहे. ‘सकाळ’मधून हे वृत्त प्रसिद्ध होताच त्यानुसार तत्कालीन उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्‍ला यांनी चौकशीचे आदेश दिले. सहायक उपवनसंरक्षक विजय गोसावी यांनी ही चौकशी केली. यात अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याचा अहवाल राज्याच्या वन सचिवांना दिला. त्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा सूचना सचिवांनी दिल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com