इंटरनेटवर शोध घेऊन 'त्याने' बनवले बांबू स्लायसिंग मशीन

Vinayak Vade Made Bamboo Slicing Machine New Innovation
Vinayak Vade Made Bamboo Slicing Machine New Innovation

कोल्हापूर -  बांबूपासून सूप, बुट्टी, दुरडी तसेच वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. बुरुड समाजातील लोक हा व्यवसाय करतात. या कामात बांबूपासून बेळ म्हणजे बांबूचे स्लायसिंग करण्याचे काम अवघड असते. कोयत्याच्या साह्याने हे काम करावे लागते. यात जरा लक्ष विचलित झाले तर हाताला जखम होऊ शकते.  असंच काम करताना आईच्या हाताला होणाऱ्या जखमा, तिची सोलून निघणारी घाताची कातडी हे पाहून विनायक वडे या तरुणाने बेळ, पट्ट्या तयार करण्याचे बांबू स्लायसिंग मशीन स्वतः बनविले. 

 विनायक ने नुकतेच मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केला आहे. घरात आई-वडील दोघेही परंपरागत बुरुड व्यवसाय करतात. आई दिवसभर हातात कोयता घेऊन बांबूचे बेळ तयार करायची. या वेळी अनेकदा तिच्या हाताला होणाऱ्या जखमा आणि डोळ्यात येणारे अश्रू विनायक टिपायचा.  तो व्यथित व्हायचा. आईचं हे कष्ट कमी करण्याच्या उद्देशाने तो पर्याय शोधू लागला. इंटरनेटवर शोध घेऊन बांबू स्लायसिंग मशीन कसे तयार होते ? हे समजावून घेतले. 

भारतात अशा प्रकारचे मशीन उपलब्ध नाही. हे त्याला कळाले. मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये हे मशिन वापरतात मात्र ते घरी वापरू शकत नसल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर स्वतःच असे मशीन तयार करण्याचा निर्णय त्याने घेतला. या मशीन मध्ये पार्ट कोणते वापरायचे? त्याची रचना कशी करायची? याचा अभ्यास करून त्याने मशीनचे एक डिझाईन तयार करून पार्ट्स बनवून घेतले व ते जोडले. घरातल्या सिंगल फेज विजेवर चालणारी मोटार जोडली. दोन रोलर,चेन आणि स्लायसिंग ब्लेड जोडून एका महिन्याच्या प्रयत्नानंतर अवघ्या पस्तीस ते चाळीस हजारात हे मशीन तयार झाले. 

तयार केलेले मशीन अचानक घरी आणून त्याने आई-वडिलांना आश्चर्याचा धक्का दिला. या मशीन ची यशस्वी चाचणी झाल्यानंतर त्याच्या आईच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहायला लागले. आईच्या वेदना कमी करण्याचा उद्देश सफल झाल्याचा विनायक सांगतो. 

या मशीनमध्ये अर्ध्या इंचापासून एक मिलीमीटर पऱ्यांच्या बांबूच्या पट्ट्या निघतात. अवघ्या दहा मिनिटात पाचशे पट्ट्या या मशीन मधून निघतात. आधी बांबूच्या एका काठीत तीन पट्ट्या तयार व्हायच्या. आता त्याचे प्रमाणही वाढले आहे. विनायक ने आपली कल्पकता,  इंजिनिअरिंगचा अभ्यास या जोरावर आईच्या वेदना ओळखून जिद्दीने हे मशीन तयार करून एक नवीन प्रेरणा दिली आहे. 

आमचा परंपरागत बूरुड व्यवसाय आहे. कोयत्याने बाबूचे स्लायसिंग काम करताना आईच्या वेदना मला पाहवत नव्हत्या. मी त्यासाठी हे मशिन बनवण्याचा निर्णय घेतला आणि मला त्यात यश आले. आईचे कष्ट कमी केलाचा आनंद मला आहे. पुढे ही नविन प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न राहिल. 
 - विनायक वडे

ही मशिन बनवुन माझ्या कष्टाचे विनायकने ऋृणच फेडले असं म्हणता येईल. तो लहानपणापासुन हूशार आहे. त्याने केलेल्या या प्रयोगाने आम्हाला त्याचा अभिमान आहे. त्याने समाजासाठी उपयोगी पडणारे आणखीन नविन प्रयोग करावेत अशी आमची अपेक्षा आहे. 
- संगिता वडे , विनायकच्या आई

मशिनमुळे व्यवसायाला आली आर्थिक स्थिरता 

हाताने बांबूचे स्लायसिंग करण्यासाठी आधी त्यांना तीन दिवस लागत होते. आठवड्यात अवघ्या २५ दुरड्याचं विणकाम पुर्ण व्हायचं पण आता १०० नग तयार होतात. या मशिनमुळे वेळ, कष्ट वाचले आहेत तसेच व्यवसाय ही तिपटीने वाढला आहे. मशिनच्या मदतीने बांबूच्या स्लायसिंगमुळे वस्तुची गुणवत्ता सुधारली आहे. त्यामुळे ग्राहकांची देखील या उत्पादनांना मागणी वाढत आहे. आधी दिवसाला २५० मिळायचे आता १५०० ते २००० पर्यत मिळतात. महिन्याकाठी २० हजाराचा नफा ४० हजारापर्यत पोहचला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com