शिरोळ तालुक्यातील कोथळीत आढळला दुर्मिळ वीरगळ लेख

शिरोळ तालुक्यातील कोथळीत आढळला दुर्मिळ वीरगळ लेख

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे दुर्मिळ वीरगळ लेख आढळून आला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांनी हा वीरगळ लेख शोधून काढला. १२ व्या शतकातील हा वीरगळ असून कोथळी गावातील दोरय्या याचा मुलगा मल्लय्यन हा स्त्रियांचे रक्षण करताना धारातीर्थी पडल्याचे या वीरगळ लेखात म्हटले आहे. 

प्राचीन काळात एखादा वीर पुरूष धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ स्मारकशिळा उभारल्या जात होत्या. त्याला ‘वीरगळ’ असे म्हणतात. हे वीरगळ वैविध्यपूर्ण आकारात शिल्पांकित केलेले असतात. अशा वीरगळावर खालच्या टप्प्यात संबंधीत वीर पुरूषाने केलेल्या लढाईचे शिल्प असते. त्यानंतरच्या टप्प्यात  वीर पुरूषाला अप्सरा घेऊन जात आहेत, असे शिल्प असते.

वीरगळ हे महाराष्ट्रात गावोगावी आढळतात.  मात्र, ज्या योद्धयाच्या स्मरणार्थ वीरगळ उभारले आहेत, त्याचे नांव मात्र क्वचितच एखाद्या वीरगळावर आढळते. महाराष्ट्रात वीरगळावरील लेख खूपच दुर्मिळ आहेत. दक्षिण महाराष्ट्रात खिद्रापूर आणि आगळगाव वगळता अन्य कोणत्याही गावात आजवर असे वीरगळ लेख आढळून आलेले नाहीत.  खिद्रापूरचा वीरगळ लेख उत्तरकालीन शिलाहर राजवटीतील आहे.

इतिहास अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर हे गेली अनेक वर्ष वीरगळांवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण वीरगळ शोधून काढले आहेत. वीरगळांचा अभ्यास करीत असताना प्रा. काटकर आणि कुमठेकर यांना शिरोळ तालुक्यातील कोथळी गावात कल्लेश्वराच्या मंदिरात एक वीरगळ आढळून आला. मंदिरातील एका भिंतीला टेकून तीन वीरगळ ठेवले आहेत. त्यांची बारकाईने पाहणी केली असता, त्यापैकी एका वर हळेकन्नड लिपीत लेख आढळून आला. लेख युक्त वीरगळ सुमारे अडीच फूट उंचीचे आहे. यावर एक वीर ढाल आणि तलवार घेऊन एका समुहाशी लढाई करताना दाखविण्यात आला आहे. वीराच्या मागे एक स्त्री दर्शवली आहे.

या वीरगळावर कलशाकृती भागावर ध्वज आहेत. त्यानंतर टप्प्याच्या मोकळ्या जागेवर हळेकन्नड लिपीत लेख कोरला आहे. लेखात कोथळी गावातील दोरय्याचा मुलगा मल्लयन हा स्त्रियांचे रक्षण करताना  धारातिर्थी पडल्याचे म्हटले आहे.  

अक्षराच्या वळणावरून आणि लेखनशैलीवरून तो १२ व्या शतकातला असावा, असे अनुमान करता येते. या वीरगळ अभ्यासासाठी बाळासाहेब निपाणे-पाटील (मिरज), अमोल चिकोडे, गणेश जंगम, कुमार सुतार यांचे सहकार्य लाभले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com