चांदोलीतून विसर्ग, वारणा काठावर पूरस्थिती... कोयनेतून 80 टीएमसीनंतरच विसर्ग 

विष्णू मोहिते
Thursday, 6 August 2020

सांगली ः चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणातून आज दुपारपासून 4400 क्‍युसेक्‍सने पाणी सोडण्यात येत आहे. वारणा काठावर पूरस्थिती निर्माण झाली असून कृष्णा नदीचे पाणीही पात्राबाहेर पडले. कोयना धरणात 67.20 टी. एम. सी. पाणीसाठा असून 80 टी. एम. सी. च्यावर पाणीसाठा गेल्यानंतर विसर्ग केला जातो.

सांगली ः चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणातून आज दुपारपासून 4400 क्‍युसेक्‍सने पाणी सोडण्यात येत आहे. वारणा काठावर पूरस्थिती निर्माण झाली असून कृष्णा नदीचे पाणीही पात्राबाहेर पडले. कोयना धरणात 67.20 टी. एम. सी. पाणीसाठा असून 80 टी. एम. सी. च्यावर पाणीसाठा गेल्यानंतर विसर्ग केला जातो.

सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी संध्याकाळी 23.5 फुटावर पोहोचली होती. संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएच्या दोन तुकड्या आज तैनात केल्या आहेत. चांदोलीसह शिराळा तालुक्‍यात अतिवृष्टी सुरुच असून जनजीवन विस्कळित झाले आहे. अलमट्टी धरणाचा पाणीसाठा 90 टक्‍क्‍यावर गेला असून 31 हजार 922 क्‍युसेकने विसर्ग सुरु आहे. 
वारणा नदीवरील दोन पूल पाण्याखाली असून आठ बंधारे बुडाले आहेत. कृष्णा काठावरील बहुतांशी बंधारे पाण्याखाली गेले. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पाऊस सुरुच असला तरी अन्य भागात मात्र पावसाचा जोर कमी झाला. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले असून जोरदार पाऊस होत आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर आजही कायम राहिला. चांदोली धरण क्षेत्रात चोवीस तासात तब्बल 165 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दिवसभरात 35 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. धरणात 28.15 टीएमसी पाणीसाठा आहे. चांदोलीमध्ये अतिवृष्टी सुरुच असल्याने धरणातून सांडव्याव्दारे 3 हजार आणि वीज निर्मितीतून 1400 क्‍युसेक्‍स असे 4400 क्‍युसेक्‍सने पाणी सोडले आहे. कोयना धरण परिसरातही पावसाचा जोर कायम आहे. तेथे चोवीस तासात 202 मिलिमिटर पाऊस झाला. आज दिवसभरात मात्र 81 मिलिमिटर पाऊस झाला. सध्या 67.20 टी.एम.सी. पाणीसाठा आहे. महाबळेश्वर, धोम आणि कण्हेर याठिकाणीही जोरदार पाऊस सुरु आहे. धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीचे पाणीही पात्राबाहेर पडले. वारणा नदीवरील काखे-मांगले पूल पाण्याखाली आहे, याशिवाय आठ बंधारे पाण्याखाली कायम आहेत. कृष्णा नदीवरील बहुतांशी बंधारे आज पाण्याखाली गेले आहेत. 

कृष्णेची पाणीपातळी- 
नद्यांची पाणीपातळी पुढीप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 13.7, बहे 9.3, ताकारी 25.5, भिलवडी 25.10, आयर्विन सांगली 23.1, अंकली 28.3 आणि म्हैसाळ बंधारा 35 फूट. 

........ 
 
धरण, क्षमता, पाणीसाठा, टक्केवारी, धरण विसर्ग ( टी. एम. सी) 
वारणा, 34.40, 28.62, 83.19, 4,400 
कोयना, 105.25, 67.20, 64.00, .... 
अलमट्टी, 123.00, 94.37, 89.65, 31,922 
..................................................... 
 

......... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Visarga from Chandoli, precedence on the banks of Warna ... Visarga only after 80 TMC from Koyne