मुख्यमंत्र्यांच्या स्वागतातही देशमुखांच्या दुहीचे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना महापालिकेतील विविध प्रश्‍नांबाबत काय सांगायचे, याविषयी चर्चा करण्याऐवजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गप्प राहणे पसंत केले. तसेच विमानतळावर प्रवेश केल्यानंतर आपापसात चर्चा करतील असे वाटत होते. परंतु, दोन्ही मंत्री दोन बाजूला उभे असल्याचे दिसून आले. 

विमानतळावर पदाधिकाऱ्यांना प्रवेश न दिल्याने नाराज भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची मनधरणी करण्याऐवजी दोन्ही मंत्री गप्पच होते. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी विमानतळाच्या बाहेरच अडविले. त्यावर नाराज झालेल्या श्री. पवार यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्‍त केली. त्यावेळी आम्ही काय गुन्हेगार नाही, पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहोत, असे पोलीस आयुक्‍तांना सांगावे लागले. तेव्हा पोलीस आयुक्‍त महादेव तांबडे आणि भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यातील शाब्दीक चकमकीवेळीही सहकारमंत्र्यांनी श्री. पवार यांची भूमिका रास्त असल्याचे सांगितले. परंतु, पालकमंत्र्यांनी त्यावेळी मात्र मौन बाळगले होते. 

मुख्यमंत्री विमानतळावर येण्यापूर्वी सहकारमंत्री अधिकाऱ्यांशी बोलण्यात मग्न होते तर पालकमंत्री दुसऱ्या बाजूला गप्प उभे होते. काही वेळानंतर मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर आगमन होताच पालकमंत्री देशमुख तत्काळ त्यांच्या दिशेने गेले.

सहकारमंत्री मात्र मागेच होते. थोड्या वेळाने सहकारमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसमवेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री आणि पालकमंत्री एकाच वाहनातून वीरशैव लिंगायत संमेलनाच्या कार्यक्रमस्थळी रवाना झाले.

Web Title: Visible rift in Solapur BJP during CM Devendra Fadnavis visit