रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा म्हणजे निव्वळ उपचार....

प्रमोद जेरे
Friday, 22 January 2021

कोल्हापूर - सातारा दरम्यानचा रेल्वे मार्ग, स्थानकांच्या भेटीसाठी शुक्रवारी कोल्हापूर, मिरज, सांगली दौ-यावर येत असलेले मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजिव मित्तल यांचा दौरा म्हणजे निव्वळ उपचार ठरणार असल्याचा आरोप प्रवासी संघटनानी केला आहे.

मिरज : कोल्हापूर - सातारा दरम्यानचा रेल्वे मार्ग, स्थानकांच्या भेटीसाठी शुक्रवारी कोल्हापूर, मिरज, सांगली दौ-यावर येत असलेले मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजिव मित्तल यांचा दौरा म्हणजे निव्वळ उपचार ठरणार असल्याचा आरोप प्रवासी संघटनानी केला आहे. 45 ते 50 मिनिटांत ते मिरज स्थानकाची पाहणी करणार आहेत. त्याच कालावधीत महाव्यवस्थापक मित्तल मिरज रेल्वे स्थानकावरील अन्य विभागांनाही भेट देणार असल्याने प्रवासी संघटना, लोकप्रतिनीधींसाठी त्यांनी 15 ते 20 मिनीटांचा कालावधी राखून ठेवला आहे. एवढ्या वेळेत महाव्यवस्थापकांची भेट म्हणजे प्रवाशांची दिशाभूल करणारी आहे, असा आरोप संघटनांनी केला आहे. 

कोरोना लॉकडाऊननंतर होत असलेला महाव्यवस्थापक मित्तल यांचा कोल्हापूर, सांगली, सातारा, जिल्ह्याचा दौरा महत्वाचा आहे. सध्या कोल्हापूर, पुणे, बेळगाव, सोलापूर पंढरपूरसह अनेक महत्वाच्या गाड्या बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. सांगली - कोल्हापूर दरम्यान तर एखादी डेमू रेल्वे तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. 

कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, मिरज येथील प्रवाशांच्या मागण्यांबाबतही दौ-यात चर्चा होणे अपेक्षीत आहे.मिरज रेल्वे स्थानकाशी संबंधित मागण्यांबाबत मिरज रेल्वे कृती समीती, रेल्वे प्रवासी संघ या संघटनांसह आमदार सुरेश खाडे हेही महाव्यवस्थापक मित्तल यांची भेट घेणार आहेत. मिरज स्थानकाच्या नामकरणाच्या मागणीसाठी मातंग समाज संघटना, लिंगायत समाजाचे शिष्टमंडळही महाव्यवस्थापक मित्तल यांना भेटणार आहे. इचलकरंजी शहर रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी इचलकरंजी येथील अनेक संघटना महाव्यवस्थापक मित्तल यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेला महाव्यवस्थापकांचा दौरा कितपत यशस्वी होतो याकडे लक्ष लागले आहे. 

सुरक्षेचे स्तोम 
महाव्यवस्थापक मित्तल यांच्या मिरज भेटीवेळी रेल्वे सुरक्षा बलाने मिरज रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाव्यवस्थापक मित्तलना गर्दीपासून दूर ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरही सुरक्षा बलाने पोलिसांचा बंदोबस्त वाढववला आहे. मर्यादीत स्वरुपात मित्तल यांना भेटण्याची संधी मिळणार आहे. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The visit of the General Manager of Railways is a net treatment ....