वाहनांच्या गर्दीतून येतो सुतळी बॉम्बचा आवाज! 

परशुराम कोकणे
सोमवार, 11 जून 2018

सोलापूर : रस्त्यावरून जाताना अचानक सुतळी बॉम्ब किंवा मोठ्या आवाजाचा फटाका फुटल्याचा आवाज आल्याचे आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असेल. मोठ्या आवाजामुळे वाहनधारक दचकल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून बाईकर्सनी धिंगाणा घातला असून आजवर एकावरही पोलिसांकडून कारवाई झाली नाही. 

सोलापूर : रस्त्यावरून जाताना अचानक सुतळी बॉम्ब किंवा मोठ्या आवाजाचा फटाका फुटल्याचा आवाज आल्याचे आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असेल. मोठ्या आवाजामुळे वाहनधारक दचकल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून बाईकर्सनी धिंगाणा घातला असून आजवर एकावरही पोलिसांकडून कारवाई झाली नाही. 

बुलेट किंवा अन्य महागड्या दुचाकीच्या सायलेंसरमध्ये छेडछाड करून मोठा आवाज करण्याचे फॅड तरुणांमध्ये दिसून येते. सायलेंसरची पुंगळी काढून जयंती उत्सवांच्या वेळी आवाज करणारे महाभागही आपल्याकडे कमी नाहीत. वाहन वेगाने चालवत जाताना पायाने स्टॅण्ड खाली ढकलून आगीच्या ठिणग्या उडवण्याचेही प्रकारही रोजच घडत आहेत. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची जबाबदारी असणाऱ्या वाहतूक शाखेकडून अशा दुचाकीस्वारांकडून कारवाई होताना दिसत नाही. आवाज करणारे दुचाकीस्वार वेगाने निघून जातात, पाठलाग करूनही ते सापडत नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

शहरातील होटगी रोड, व्हीआयपी रोड, रेल्वे स्थानक, शिवाजी चौक, बुधवार पेठ, जुळे सोलापूर, विजापूर रोड या भागात गेल्या काही दिवसांपासून वाहनाच्या सायलेंसरमधून आवाज करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. वाहन चालू स्थितीत असताना अचानक बंद करून पुन्हा चालू केल्यावर आवाज येतो, असे काहींचे म्हणणे आहे. अचानक येणाऱ्या आवाजामुळे लक्ष विचलीत होऊन अपघातही घडत आहेत. 

सायलेंसरमधून आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांकडून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई केली जाते. सायलेंसरमधून सुतळी बॉम्ब किंवा मोठ्या फटाक्‍याचा आवाज करून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर तत्काळ 9881260998 या क्रमांकावर संपर्क साधावा. आवाज करणाऱ्या वाहनाचा क्रमांक नोंद करून पोलिसांना कळवावा. याबाबतची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. 
- वैशाली शिंदे, 
सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा 

वाहनाच्या सायलेंसरमध्ये बदल करून मोठा आवाज करण्याचे फॅड तरुणांमध्ये दिसून येते. अनेकदा गर्दीच्या ठिकाणी अचानक मोठा आवाज येतो आणि रस्त्यावर गोंधळ उडतो. आवाज करणारा दुचाकीस्वार वेगाने पुढे निघून जातो. अशा दुचाकीस्वारांवर कडक कारवाई करायला हवी. मोठ्या आवाजामुळे किरकोळ अपघात होत आहेत. आवाजामुळे महिला आणि लहान मुले घाबरल्याचे दिसून येतात. 
- अमोल तारापुरे, 
सामाजिक कार्यकर्ता

Web Title: voice of sutali crackers from vehicles