मंडलिकांना मतदान, हाच आम्हाला आहेर !

मंडलिकांना मतदान, हाच आम्हाला आहेर !

कोल्हापूर - राजकारणात कोण कसा प्रचार करेल, हे सांगता येत नाही. कार्यकर्त्यांचा उत्साहही अमाप असतो. कागलमधील निष्ठावंत कार्यकर्त्याने प्रा. संजय मंडलिक खासदार व्हावेत, यासाठी मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेवर त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ‘मंडलिकांना मतदान, हाच आमच्यासाठी आहेर, भेटवस्तू असेल,’ असेही पत्रिकेत लिहिले आहे. सध्या कागल तालुक्‍यात ही लग्नपत्रिका, त्याखालील टीप चर्चेत आली आहे.

कागल तालुका म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. आजपर्यंत येथे घडलेल्या अनेक गोष्टी राज्यभर चर्चेत आल्या आहेत. आताही तसेच घडले आहे. 

कागल पंचायत समितीचे उपसभापती विजय महादेव भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र अभयसिंह भोसले यांचा विवाह रविवारी (ता. १० फेब्रुवारी) होत आहे. त्यांची पत्रिका आता गल्लोगल्ली पोच होत आहे. हे लग्न कोणाचे आहे, ते कसे होणार, याच बरोबर या पत्रिकेवर तळात असलेल्या टीपवरून हे लग्न चर्चेत 
आले आहे. 

‘‘कृपया आहेर व भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत. मा. संजयदादा मंडलिक यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करा... तेच आमच्यासाठी भेटवस्तू असेल’’, ही टीप वाचल्यानंतर अनेकांनी ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. पत्रिकेच्या मागील बाजूस दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे छायाचित्र आणि ‘आभाळ माया कल्पवृक्षाची!’ असाही उल्लेख केला आहे. मंडलिक गटाचा एखादा सच्चा कार्यकर्ता काय करू शकतो, हे त्यांनी या पत्रिकेतील मजकूर आणि त्यावरील छायाचित्रावरून दाखवून दिले आहे. सध्या ही लग्नपत्रिका अनेक व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवरून व्हायरल झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com