बाटली जिंकली... महिला निराश !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

दारुबंदीसाठी झालेल्या मतदानाचा अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतरच निकालाची अधिकृत घोषणा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ढेबेवाडी (जि. सातारा)  ः ताईगडेवाडी (तळमावले, ता. पाटण) येथील महिलांनी तब्बल वर्षापासून उभारलेला आणि कायम धगधगत ठेवलेला दारूबंदीचा लढा अखेर अयशस्वी झाला. "बाटली'चे भवितव्य ठरविण्यासाठी घेतलेल्या मतदान प्रक्रियेत आडव्या बाटलीला 282, तर उभ्या बाटलीला फक्त 38 मते मिळाली, तरीही एकूण 608 पैकी निम्म्याच्यावर म्हणजे 305 मतांचा टप्पा गाठण्यात आंदोलनकर्त्या कमी पडल्याने आडव्या बाटलीला जास्त मते मिळूनही उभी बाटलीच जिंकली. या प्रक्रियेत 23 मते अवैध ठरली. या निकालाची अधिकृत घोषणा आज करण्यात आली नाही.
 
तळमावलेतील सीताई समूहाच्या अध्यक्षा कविता कचरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी महिला दिनी सुरू झालेला महिलांचा दारूबंदीसाठीचा लढा मतदानाच्या प्रक्रियेपर्यंत पोचण्यास वर्षभराचा कालावधी गेला. दरम्यानच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन वेळा महिलांच्या स्वाक्षऱ्यांची पडताळणी करण्यात आली. तिसरी पडताळणी यशस्वी ठरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवारी (ता.26) मतदान झाले. ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान घेण्यात आले. मतदानासाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली. आडव्या बाटलीसाठी यादीतील 608 महिला मतदारांपैकी 305 मतदान अपेक्षित होते. स्थानिक पोलिसांसह "उत्पादन शुल्क'च्या पोलिस कर्मचाऱ्यांचा मतदान केंद्राला गराडा होता. मतदान ओळखपत्र, आधार कार्ड सोबत घेऊन महिला मतदानासाठी केंद्रावर दाखल होत होत्या. मतपत्रिकेवर स्वाक्षरी व अंगठा घेतल्यानंतर उभ्या किंवा आडव्या बाटलीचा पर्याय निवडून त्यावर शिक्का मारून मतपत्रिका पेटीत जात होत्या. स्थानिक रहिवासी महिलांसह नोकरी व उद्योगानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या कुटुंबातील महिलाही मतदानासाठी आवर्जून गावी आल्या होत्या. 

वाचा : Video : रणरागिणी सरसावल्या; मतदानासाठी लागल्या रांगा

निवासी तहसीलदार प्रशांत थोरात, ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, "उत्पादन शुल्क'चे निरीक्षक आर. एस. पाटील, दुय्यम निरीक्षक पी. ए. बोडेकर, शिरीष जंगम, प्रियांका भोसले आदी आधिकारी सकाळपासून मतदान केंद्रावर तळ ठोकून होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार समीर यादव यांनी काम पाहिले. विभागातील मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल व अन्य महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदान व मतमोजणी प्रक्रियेत साहाय्य केले. सायंकाळी पाच वाजता मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. निकाल ऐकण्यासाठी आंदोलनकर्त्या महिलांसह नागरिकांनी गर्दी केली होती. मतदानाचा अधिकृत निकाल जाहीर झाला नाही. मात्र, आडव्या बाटलीसाठी अपेक्षित मतांचा टप्पा गाठण्यात महिला कमी पडल्याने बाटली उभीच राहिल्याचे स्पष्ट झाले. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असून, त्यानंतरच निकालाची अधिकृत घोषणा होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
दरम्यान, मतदान केंद्रापासून काही अंतरावर महिला मोठ्या संख्येने थांबल्या होत्या. मतमोजणीनंतर त्यांनी संताप व्यक्त करत ही प्रक्रियाच मान्य नसल्याचे सांगितले. आमचे आंदोलन चिरडण्याच्या दृष्टीनेच उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व आजच्या मतदान प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले असा आरोप करत आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत हा लढा चालूच राहील, असेही महिलांनी नमूद केले. खुल्या मतदानाची आमची मागणी धुडकावून गुप्त मतदान घेतले. बॉलेट पेपरवर मतदानाऐवजी ईव्हीएम मशिनची मागणी होती. आमच्यावर हा अन्याय झाला असून, भविष्यात हा लढा चालूच राहील. आता पुन्हा फेरमतदान घेण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी दिला. सरपंच शोभा भुलुगडे, कविता कचरे आदींनी या वेळी तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्या

मतपत्रिकेतील चिन्हांच्या क्रमावरून संभ्रम 

मतपत्रिकेवर दारू दुकानांची नावेही छापलेली होती. मतदानापूर्वी काही दिवस अगोदर आंदोलनकर्त्यांना मिळालेल्या मतपत्रिकेच्या नमुन्यावर पहिल्या क्रमांकाला आडव्या बाटलीचे, तर दुसऱ्या क्रमांकावर उभ्या बाटलीचे चिन्ह छापलेले होते. मात्र, प्रत्यक्षात आज मतपत्रिकेवर ही दोन्ही चिन्हे उलट क्रमाने छापलेली आढळल्याने नमुना पत्रिकेनुसार प्रचार व जागृती केलेल्या आंदोलकांची ऐन वेळी तारांबळ झाली. बदललेला क्रम आपल्या महिला सहकाऱ्यांना सांगण्यासाठी त्यांची धडपड सुरू दिसली. याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आक्षेपही घेतला. मात्र, त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने योग्य ठिकाणी दाद मागू, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

हेही वाचा : रायबाच्या शिक्षणासाठी लाखमोलाची मदत; तानाजी मालुसरेंच्या कुटुंबियांची भावना

वाचा : थॅंक्यू सकाळ; कोरोनाच्या विळख्यातून परतलेल्या भारतीयांची भावना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting Decreased In Taigadewadi For Liquor Shop Ban