"पदवीधर, शिक्षक'साठी आज मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

विष्णू मोहिते
Tuesday, 1 December 2020

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उद्या (ता. 1) मतदान होत आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

सांगली ः पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी उद्या (ता. 1) मतदान होत आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगसह नियमांचे पालन करून मतदान होईल.

जिल्ह्यात पदवीधरसाठी 143; तर शिक्षकसाठी 48 मतदान केंद्रे असून दोन्ही मिळून 94 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मंगळवारी सकाळी 8 ते सायकांळी 5 पर्यंत होणार असून, मतमोजणी गुरुवारी (ता.3) होणार आहे. मिरज तालुक्‍यासाठी सर्वाधिक 10, तर पलूससाठी सर्वात कमी म्हणजे 2 मतदान केंद्रे आहेत. 

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक मंगळवारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्यामुळे योग्य काळजी घेण्यात आली आहे. मतदान केंद्र खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

प्रत्येक मतदाराचे तापमान तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांचे तापमान अधिक आढळेल त्यांना मतदानाची वेळ संपण्यापूर्वी एक तास मतदानासाठी परवानगी देण्यात येणार आहे. रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात येणार आहेत. सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरवात होणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पदवीधरसाठी 143, तर शिक्षकसाठी 48 मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त केलेले कर्मचारी सायंकाळी दाखल झाले. मतदान प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी क्षेत्रिय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान केंद्र एकाच ठिकाणी आहे. तेथे गर्दी होऊ नये, याची खबरदारी घेतली जात असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेप 

  • दोन्हींसाठी 191 मतदान केंद्रे. 
  • 422 आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक. 
  • मिरजसाठी सर्वाधिक 10, तर पलूससाठी सर्वांत कमी म्हणजे 2 मतदान केंद्रे. 
  • मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर. 

उमेदवार आणि मतदार 

 पदवीधर मतदारसंघ 

  • उमेदवार : 62 
  • मतदार : 87,233 \

 शिक्षक मतदारसंघ 

  • उमेदवार : 35 उमेदवार 
  • मतदार : 6,812 

ओळखपत्र आवश्‍यक 
पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी मतदान करण्यासाठी जाताना सोबत निवडणूक ओळखपत्र घेणे आवश्‍यक आहे. ते नसल्यास आधार कार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, शासकीय किंवा खासगी संस्थेने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र (आयकार्ड), विद्यापीठाने निर्गमित केलेली पदवी, पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिव्यांग व्यक्तींना दिलेले ओळखपत्र सादर करण्याचीही परवानगी आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting for Graduate & Teacher constituency today; Administrative system ready