सातनंतर येरळवाडी परिसरात सामसूम

आयाज मुल्ला
शनिवार, 30 जून 2018

वडूज - येरळवाडी (ता. खटाव) येथे सोमवारी (ता.२५) सकाळी बिबट्या दिसल्यानंतर आज पाचव्या दिवशीही ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण कायम आहे. बिबट्याच्या भीतीने लोकांनी शेती कामांकडे पाठ फिरविली आहे, तर गावासह परिसरातील वस्त्यांवर सायंकाळी सात वाजल्यानंतर कमालीची सामसूमच दिसत आहे.

वडूज - येरळवाडी (ता. खटाव) येथे सोमवारी (ता.२५) सकाळी बिबट्या दिसल्यानंतर आज पाचव्या दिवशीही ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण कायम आहे. बिबट्याच्या भीतीने लोकांनी शेती कामांकडे पाठ फिरविली आहे, तर गावासह परिसरातील वस्त्यांवर सायंकाळी सात वाजल्यानंतर कमालीची सामसूमच दिसत आहे.

येरळवाडी परिसरात सुमारे शंभर हेक्‍टरच्या आसपास उसाचे क्षेत्र आहे. याशिवाय तलाव परिसर असल्याने अन्य शेती पिकेही आहेत. त्यामुळे बिबट्याला परिसरात लपण्यासाठी मोठा वाव आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी दोन दिवस तळ ठोकला. त्यांच्याबरोबर ग्रामस्थही होते. गाव व परिसरातील नागरिकांना बिबट्याचे मोठे आकर्षण असले तरी बिबट्याची भीतीदेखील तेवढीच कायम आहे. त्यामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून ग्रामस्थांनी शेतीकामांकडे पाठच फिरविली आहे. शेती पिकांना कधी कधी रात्री-अपरात्री पाणी देण्यासाठी जावे लागत असले तरी ग्रामस्थांनी बिबट्याच्या भीतीने ही सर्व कामे दूरच ठेवली आहेत. गावासह परिसरातील संभाजी बागल वस्ती, गजानन ड्रायव्हर वस्ती, पोळ वस्ती आदी परिसरांतील वस्त्यांवर सात वाजताच सामसूम होत आहे. दरम्यान, वन विभागाने येथे पिंजरा लावून तातडीने बिबट्याला पकडण्याचा बंदोबस्त करावा, ग्रामस्थांना या भीतीच्या सावटातून मुक्त करावे, असे आवाहन येरळवाडीचे माजी सरपंच सदाशिव बागल यांनी केली आहे.

बिबट्याच्या आठवणी...
खटाव तालुक्‍यातील वाकळवाडी या गावात सुमारे तीस वर्षांपूर्वी एक बिबट्या आला होता. त्या वेळी त्याला ठार केल्याची घटना घडली होती. नंतर तो मृत बिबट्या येथे आणण्यात आलेला होता. मृत बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. तसेच तालुक्‍यात बिबट्या येण्याची ती पहिलीच घटना होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वी येरळवाडी येथे बिबट्या दिसल्याने वाकळवाडीतील बिबट्याच्या घटनेला उजाळा मिळाला आहे.

ग्रामस्थांनी सायंकाळनंतर घराबाहेर पडण्याचे टाळावे. एकट्याने बाहेर पडण्याऐवजी किमान चार ते पाच जणांच्या समुदायाने फिरावे. बिबट्याच्या दर्शनाबाबत उठणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
-एस. बी. चव्हाण, सहायक वनसरंक्षक

Web Title: waduj news leopard in Yerlawadi area