वाघमोडेवाडीने केले टॅंकरला हद्दपार

वाघमोडेवाडीने केले टॅंकरला हद्दपार

गोंदवले  : शेती फुलावी, चारापाणी मिळावा अन्‌ टॅंकर तर गावात नकोच, हाच एकमेव ध्यास घेऊन जलसंधारणाची कामे केली अन्‌ वाघमोडेवाडीकरांनी दुष्काळाला कायमचे "बाय बाय' केले. गेल्या दोन वर्षांत पुरेसा पाऊस झाला नसला तरी यंदाही पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरी आणि हद्दपार झालेल्या टॅंकरमुळे ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे. 

सुमारे दीड हजार लोकसंख्येचे वाघमोडेवाडी गाव आता पाणीदार म्हणून नावारूपाला आले आहे. गावालगत पाझर तलाव असूनही कधी पुरेशा पावसाअभावी तर कधी पावसाच्या पाण्याच्या नियोजनाअभावी लोकांचा घसा कोरडाच राही. दुष्काळात गावात टॅंकरने पाणीपुरवठा हा ठरलेलाच. धनगर समाज मोठ्या प्रमाणात असल्याने लोकांसह शेळ्या-मेंढ्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्नही होता. पाण्याच्या या संकटामुळे स्थलांतरामुळे गाव ओस पडत असतानाच जलसंधारणाच्या कामाचा आशेचा किरण दिसला अन्‌ एकीतून सुरू झाला दुष्काळमुक्तीसाठी संघर्ष. गावाच्या 523 हेक्‍टर क्षेत्रापैकी 489 हेक्‍टर क्षेत्रात श्रमदान व लोकसहभागातून समतल चरी, नालाबांध, गॅबियन बंधारे, शेततळी अशी विविध जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली. 

ही कामे पूर्ण झाल्यावर दुष्काळमुक्तीसाठी खरी गरज होती ती पावसाची. परंतु, गेल्यावर्षी केवळ एकच पाऊस झाला आणि वाघमोडेवाडीत पाणी खळाळू लागले. परिणामी टॅंकर हद्दपार झाला. यंदाही परिसरात अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. तरीही जमिनीतील पाणीपातळी तीस ते चाळीस फुटांपर्यंत आजही टिकून राहिली आहे. परिसरातील सर्वच साठ्यामध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाहायला मिळत आहे. केलेल्या श्रमाने पाण्याचा प्रश्न सुटल्याचे समाधान ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. 

वर्षानुवर्षे दुष्काळ सहन केला. मात्र, जलसंधारणाची कामे केल्याने कमी पावसानेही वाघमोडेवाडीत पाणीसाठा वाढला आहे. 
- आनंदराव वाघमोडे, माजी सरपंच, वाघमोडेवाडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com