वाई पालिकेचा कारभार दोन अधिकाऱ्यांवरच!

भद्रेश भाटे
शुक्रवार, 23 जून 2017

वाई - राज्य शासनाच्या सुधारित आकृतीबंधानुसार वाई नगरपालिकेत मंजूर १८ पदांपैकी केवळ दोन पदांवर सक्षम अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित १६ पदे रिक्त आहेत. प्रशासकीय बदली अंतर्गत तीन अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. या रिक्त जागांवर शासनाकडून अद्याप कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत. पर्यायाने प्रशासकीय कामकाजाबरोबर शहरातील विकासकामेही ठप्प झालेली दिसतात. नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा देण्यासाठी विविध कामे खासगी ठेकेदारांमार्फत करून घेण्याकडे पालिकेचा कल आहे.     

वाई - राज्य शासनाच्या सुधारित आकृतीबंधानुसार वाई नगरपालिकेत मंजूर १८ पदांपैकी केवळ दोन पदांवर सक्षम अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित १६ पदे रिक्त आहेत. प्रशासकीय बदली अंतर्गत तीन अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. या रिक्त जागांवर शासनाकडून अद्याप कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत. पर्यायाने प्रशासकीय कामकाजाबरोबर शहरातील विकासकामेही ठप्प झालेली दिसतात. नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा देण्यासाठी विविध कामे खासगी ठेकेदारांमार्फत करून घेण्याकडे पालिकेचा कल आहे.     

शासनाच्या राज्यस्तरीय गट  ‘क’ संवर्ग पदाच्या सुधारित आकृतीबंधानुसार वाई पालिकेत १८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी नगर अभियंता (विद्युत) व सहायक कार्यालय अधीक्षक या दोनच पदांवर सक्षम अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित १६ पदे रिक्त आहेत. शहर विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बांधकाम विभागाकडील नगर अभियंता (स्थापत्य) व पर्यवेक्षक (स्थापत्य) ही दोन्ही पदे तसेच नगररचना व विकास सेवा विभागातील नगर रचनाकार हे पद रिक्त आहे. या विभागात सक्षम व तज्ञ कर्मचारी नसल्याने शहरातील बांधकाम परवाने मिळण्यात विलंब होत आहे. बेकायदा व विनापरवाना बांधकामांवर अंकुश ठेवणे कठीण होत असल्याचे दिसते.    

बांधकाम विभागातील कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक राजेंद्र गायकवाड यांची नुकतीच सिल्लोड (औंरगाबाद), सहायक लेखापाल नितीन नायकवडी यांची जालना, तर आरोग्य विभागाकडील सहायक कर निरीक्षक नारायण गोसावी यांची बदली महाबळेश्वर येथे झाली.  या पदाचा अतिरिक्त कार्यभार अनुक्रमे श्री. राठोड (सहायक अभियंता- विद्युत), राजाराम जाधव (लिपिक), गुणवंत खोपडे (वसुली लिपिक) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

पालिकेतील विविध विभागांत अधिकारी कमी असल्याने नागरिकांना नागरी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनेक कामे खासगी ठेकेदारांकडून करून घेण्यात येत आहेत. शहरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी, गटारामधील गाळ काढणे, पथदिव्यांची व्यवस्था, पाणीपुरवठा, उद्यानाची देखभाल करण्यासाठी वार्षिक ठेका देण्यात येतो. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने प्रशासनापुढे अनेक समस्या उभ्या राहात आहेत.

ही आहेत रिक्त पदे...!
जलनि:स्सारण व स्वच्छता अभियंता, आरोग्य निरीक्षक, लेखा परीक्षक व लेखापाल, कार्यालय अधीक्षक, कर निरीक्षक, सहायक कर निरीक्षक, सहायक मिळकत पर्यवेक्षक, सहायक विधी व कामगार पर्यवेक्षक, सहायक खरेदी आणि भंडार पर्यवेक्षक, सहायक समाज कल्याण माहिती आणि जनसंपर्क पर्यवेक्षक, सहायक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक.

कोण आवाज उठवणार?
नगराध्यंक्षावर लाचलुचपत विभागाकडून झालेल्या कारवाईनंतर सत्तारूढ आणि विरोधी आघाडीत एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या राजकारणामुळे आधीच नगरपालिकेचा कारभार विस्कळित झाला आहे. अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत शासन दरबारी कोण आवाज उठविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: wai news municipal western maharashtra