‘विश्वकोश’आता एका ‘क्‍लिक’वर

भद्रेश भाटे
सोमवार, 15 जानेवारी 2018

वाई - मराठी विश्वकोशाचे वीस खंड तयार झाले असून, हे सर्व खंड मोबाईल ॲपव्दारे ऑनलाइन उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ‘विश्वकोशा’तील ज्ञान व माहितीचा खजिना जगातील सर्व वाचकांना व मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्यांना एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे.  

वाई - मराठी विश्वकोशाचे वीस खंड तयार झाले असून, हे सर्व खंड मोबाईल ॲपव्दारे ऑनलाइन उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ‘विश्वकोशा’तील ज्ञान व माहितीचा खजिना जगातील सर्व वाचकांना व मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्यांना एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे.  

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी शासनाने राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. या मंडळाचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे मराठी विश्वकोश निर्मिती करणे. या कार्यासाठी एक डिसेंबर १८८० रोजी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन केले. सुरवातील (कै.) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे मंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर (कै.) मे. पुं. रेगे, (कै.) रा. ग. जाधव, (कै.) श्रीकांत जिचकार, डॉ. विजया वाड यांनी विश्वकोशाच्या अध्यक्षपदाची धुरा संभाळली. सध्या दिलीप करंबेळकर हे अध्यक्ष आहेत.   

मंडळामार्फत विश्वकोशाचे एक ते २० खंड प्रकाशित करण्यात आले आहेत. या खंडात अंक ते ज्ञेयवाद अशा सुमारे १८ हजार नोंदी, लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. भल्या मोठ्या आकार व वजनाचे विश्वकोश ग्रंथ हाताळणे, त्यातील माहितीचा शोध घेणे हे सारेच जिकिरीचे होते. तंत्रज्ञानात जसजसे बदल होत गेले, तसे हे मराठीतील हे संचित नव्यानव्या माध्यमातून वाचकांपुढे येत गेले. सुरवातीला संगणकावर, त्यानंतर सी-डॅकच्या माध्यमातून संकेतस्थळावर हे ज्ञानकोश उपलब्ध करण्यात आले. पुढे या सर्व खंडाच्या सीडी निघाल्या तसेच पेन ड्राइव्हच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत. बदलत्या काळातील तंत्रज्ञान आणि नवीन पिढीचा विचार करीत आता हे सर्व ज्ञानाचे भांडार केवळ एका क्‍लिकवर ‘मोबाईल ॲप’वर पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.  

बुकगंगा डॉटकॉम या ग्रंथक्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने हे ॲप तयार केले आहे. या ॲपचे लोकार्पण नुकतेच वाईत पार पडले. मराठी विश्वकोश, या नावाचे हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून वाचक व अभ्यासकांना विनामूल्य डाउनलोड करता येणार आहे. या नव्या तंत्रामुळे विश्वकोशाचे वीस खंड, १५१ विषय, ३१२ सूची, १८ हजार १६३ लेख असलेले हे ज्ञानभांडार आता मोबाईलच्या एका क्‍लिकवर लोकांना सहज उपलब्ध होणार आहेत. विषय, शीर्षक, खंड आदीनुसार या माहितीचा शोध घेता येणार आहे. हा खजिना मराठी वाचकांबरोबरच मराठी भाषेवर काम करणाऱ्या जगभरातील अभ्यासकांना उपयुक्त ठरेल. अँड्रॉइड, आयफोन झिंगल या प्रमुख प्रणालीमध्ये हे ॲप वापरता येणे शक्‍य आहे. जिथे इंटरनेट सुविधा आहे, अशा जगातल्या कोठूनही आपण विश्वकोश बघू शकतो.  

मराठी विश्वकोश खंडाच्या अद्ययावतीकरणाचे कार्य मंडळाने हाती घेतले असून, त्यासाठी विविध विद्यापीठे, शैक्षणिक, संशोधन संस्था यामध्ये विषयनिहाय ज्ञानमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे ग्रंथभांडार त्या त्या क्षेत्रातील, विषयातील तज्ज्ञ लेखक, समीक्षकांच्या प्रयत्नातून समृध्द केले जात आहे. इथल्या नोंदी पुन्हापुन्हा तज्ज्ञांकडून तपासून तंत्रज्ञानाच्या वापराने अद्ययावत नोंदी वाचकांपर्यंत तत्काळ पोचविण्याची व्यवस्था केली जात आहे. माहितीची अधिग्राह्यता, प्रत्येक नोंदीला प्राथमिक संदर्भमूल्य आणि नेमक्‍या आणि वस्तुनिष्ठ शब्दात मांडलेले हे लेखन झालेले आहे. हा मराठी भाषेचा मोठा वारसा असून, आता हा ॲपच्या रूपाने तो जगभरातील वाचक व अभ्यासकांसमोर येत आहे. 

विश्वकोशाच्या २० खंडांमध्ये संपादित व संकलित केलेली माहिती कोणाही व्यक्तीला सहजपणे उपलब्ध व्हावी, यासाठी हे ॲप बनविले आहे. याचा फायदा जगभरातील मराठी भाषेचे वाचक व अभ्यासकांना होईल. बुकगंगा डॉटकॉम या संस्थेने हे ॲप सामाजिक जाणिवेतून विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे.
- दिलीप करंबेळकर, अध्यक्ष व प्रमुख संपादक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ     

सध्या इंग्रजी माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मराठी वाचन कमी होत आहे. तंत्रज्ञानातील बदलानुसार मराठी भाषेतील ज्ञानाचा खजिना नव्या पिढीला त्यांच्या माध्यमात उपलब्ध व्हावा, यासाठी हे ॲप तयार केले आहे. यापुढे ऑडिओ बुक स्वरूपात माध्यमातून श्रवण हे विश्वकोश उपलब्ध करून देण्याचा मानस असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- मंदार जोगळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुकगंगा डॉटकॉम, पुणे  

Web Title: wai satara news vishwakosh on one click