वालचंदनगर - रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासाठी ३ टीएमसी पाणी

राजकुमार थोरात 
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

वालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन पाण्याची बचत करावी. बचत करणाऱ्या वितरिकेवरील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील बचत केलेले पाणी वाढवून देणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी दिली.

वालचंदनगर - नीरा डाव्या कालव्यावरील रब्बीच्या हंगामातील दुसऱ्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांना ३ टीएमसी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन पाण्याची बचत करावी. बचत करणाऱ्या वितरिकेवरील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील बचत केलेले पाणी वाढवून देणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी दिली.

शेतीसाठीचे रब्बीचे दुसरे आवर्तन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरु होणार आहे. आगामी काळातील दुष्काळी परस्थिती पाहता पाटबंधारे विभागाने पाणी चोरी, पाणी गळती वरती लक्ष केंद्रित केले असून नीरा डाव्या कालव्यातील सायफन काढण्याची व कालवा स्वच्छतेची मोहिम सुरु आहे. रब्बीतील हंगामासाठी ३ टीएमसी पाणी देण्यात येणार असून यामध्ये इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. हे पाणी देताना प्रत्येक वितरिकेला ठरावीक कोटा मंजूर करण्यात येणार असून कोट्याप्रमाणाचे पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्या  वितरिकेवरील शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करुन पाण्याची बचत केल्यास त्याच वितरिकेवरील शेतकऱ्यांना  बचत केलेले पाणी उन्हाळी हंगामातील आवर्तनाच्या वेळी वाढवून देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. तसेच ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी तलावामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पाणी सोडण्यात येणार आहे. तलावामध्ये पाणी सोडल्यानंतर तलावातील व शेजारील विहिरीमधील पाणी उपसा नागरिकांनी  करु नये असे आवाहन धोडपकर यांनी केले आहे.

शेटफळ तलावासाठी २०० दशलक्ष घनफूट पाणी...
नीरा डाव्या कालव्यातील सायफन काढण्याची व स्वच्छता करण्याची मोहिम अंतीम टप्यात असून येत्या दोन-तीन दिवसामध्ये शेटफळ तलावासाठी पाणी सोडण्यास सुरवात करण्यात येणार आहे. तलावामध्ये २०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार अाहे. यातील ५० दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या शेटफळ, वडापुरी, पंधारवाडी, काटी, मोहितेमळा, रेडा, भोडणी, लाखेवाडी, वकिलवस्ती, निरा भीमा सहकारी साखर कारखाना, खंडोबावाडी या अकरा पाणी पुरवठ्याच्या योजनांना पाणी उपलब्ध होणार असून परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. शेटफळ तलावातील पाणी सोडल्यानंतर रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनास सुरवात होणार असून टेल टू हेड पद्धतीने पाणी देण्यात येणार आहे. 

Web Title: Walchandnagar - For the second rotation of Rabi, 3 TMC water