आम्ही चालायचं कसं ?  साताऱ्यात विद्यार्थ्यांची होतेय कसरत

तेजस सुपेकर
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

तहसील कार्यालय ते बस स्थानकापर्यंत पदपथावर अतिक्रमणे असल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यातून चालत जावे लागते, त्यात असा वाहनांचाही अडथळा होतो. 

सातारा : ग्रेड सेपरेटरचे काम... बस स्थानक रस्त्याच्या पदपथांवर अतिक्रमणे... बेशिस्त वाहनचालक... स्टॅंटबाज रायडर... टपोरीगिरींचे टॉंट मारणे... या "टास्क'ला सातारा शहरातील महाविद्यालय, शाळांमध्ये येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहेत. मात्र, त्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही, हे दुर्दैव आहे. 
सातारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून, येथील शाळा, महाविद्यालयातील जिल्हाभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. काही विद्यार्थी येथे राहतात, तर बहुतांश विद्यार्थी एसटी बस, खासगी वाहनांद्वारे ये- जा करतात. महाविद्यालय ते बस स्थानक अथवा त्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील थांब्यावर जावे लागते. मात्र, शिक्षणासाठी येणाऱ्या या विद्यार्थ्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहेत. मरिआई कॉम्प्लेक्‍स परिसरात अतिशय बेशिस्तपणे वाहनाची वर्दळ सुरू असते. त्यामुळे चालताना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. पोवई नाक्‍यावरील जिल्हा मध्यवर्ती बॅंक समोरील रस्ता अतिशय लहान असून, त्यात वाहने अतिशय वेगाने चालवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. 
पोवई नाका ते बस स्थानक रस्त्यावरील पदपथावर बेकायदेशीरपणे अतिक्रमणे थाटली आहेत. शिवाय, रिक्षा, वडापची वाहने रस्त्यावरच उभी केलेली असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते. मात्र, त्याकडे ना पालिका लक्ष देत आहे ना वाहतूक शाखेचे पोलिस. या रस्त्यावरून वाहनांची सातत्याने व वेगाने वर्दळ सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका असतो. 
बस स्थानकात टपरोगिरी करणारे अनेक जण थाटामाटात बसलेले असतात. त्यांचे टॉंटही विद्यार्थिनींना सहन करावे लागतात. शिवाय, बस स्थानकात जागा अडवून बसले असल्याने मुलींना बस स्थानकाबाहेर छत्री घेऊन पावसात उभे राहावे लागते. या मार्गांवर जाता- येताही मुलींना टवाळखोर मुलांचा त्रास होत असतो. 
महाविद्यालय ते बस स्थानक रस्ता तसेच बस, वाहन थांब्यांवर स्टॅंटबाजी करणाऱ्यांचा त्रास मुलींना सहन करावा लागतो आहे. मात्र, याकडे पालिका व पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 

पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने तेथे रस्ते अतिशय लहान असल्याने आम्हा सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयास येताना, जाताना खूप त्रास होत असतो.
- अपर्णा शिंदे 

पदपथांवर अनधिकृतपणे दुकाने थाटली आहेत. त्याला ठेकेदार, लोकप्रतिनिधींचा आश्रय असल्याने त्यांवर कारवाई होत नाही. परिणामी, जीव मुठीत धरून आम्हाला रस्त्यांतून चालावे लागते.
- पूजा चव्हाण 

बस स्थानकात अनावश्‍यक गर्दी करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना बस स्थानकात बसण्यास जागा मिळत नसल्याने पावसात भिजत उभे राहावे लागते. आजारी पडण्याची भीतीही असते.
- साहिल खवळे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Walking on the road became difficult says students