वारकऱ्यांची वर्दळीने पंढरपूर गजबजले 

राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

पंढरपूर - कार्तिकी यात्रेसाठी चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील 65 एकर परिसरात आजअखेर सुमारे 175 दिंड्यांचे आगमन झाले आहे. दिंडीतील वारकऱ्यांनी उभारलेले तंबू व राहुट्यांमधून तब्बल एक लाख 81 हजार 357 वारकऱ्यांच्या निवासाची सोय झाली आहे. वारकऱ्यांची वर्दळ वाढल्याने हा परिसर गजबजून गेला आहे. 

कार्तिकी यात्रेला आलेल्या वारकऱ्यांसाठी प्रशासनाने 65 एकर जागेमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये तंबू व राहुट्या उभारण्यासाठी स्वतंत्र प्लॉट, पिण्याचे पाणी, पुरेशी प्रकाशव्यवस्था, तात्पुरती फायबरची स्वच्छतागृहे, प्रशस्त रस्ते आदी सुविधांचा समावेश आहे. वारकऱ्यांची वाढती गर्दी पाहता यंदा प्रथमच 226 कायमस्वरूपी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. 

मुंबई येथील सत्यसाई मोबाईल प्रोजेक्‍टच्या वतीने वारकऱ्यांना वैद्यकीय मोफत सुविधा दिली जात आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी येथे 24 तास पोलिस बंदोबस्त आहे. प्रशासनाच्या वतीने आपत्कालीन सुविधा केंद्रही सुरू करण्यात आले आहे. दिंडीकऱ्यांना अखंड वीजपुरवठा पुरवण्यासाठी वीज वितरण कंपनीने कर्मचाऱ्यांचे पथक तयार ठेवले आहे. 

65 एकरांतील सुविधा 

- निवासाकरिता 419 प्लॉट 

- 300 तात्पुरती स्वच्छतागृहे 

- 226 कायमस्वरूपी स्वच्छतागृहे 

- आपत्कालीन सुविधा केंद्र- एक 

- प्राथमिक वैद्यकीय उपचार केंद्र- एक 

Web Title: warkaris in pandharpur