साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा

साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा

पंढरपूर (सोलापूर) : साखर कामगारांच्या सहनशिलतेचा अंत संपला. यापुढे अन्याय सहन करणार नाही. येत्या महिनाभरात साखर कारखानदारांनी कामगारांचे थकीत वेतन द्यावे, अन्यथा कारखाने बंद पाडू, असा निर्वाणीचा इशारा राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी आज येथे दिला. 

सोलापूर जिल्ह्यातील साखर कामगारांचा शनिवारी (ता. 14) इसबावी येथील बाळकृष्ण मठात मेळावा पार पडला. कामगारांना मार्गदर्शन करताना त्यांनी हा इशारा दिला. यावेळी कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष राव पाटील, उपाध्यक्ष युवराज ननवरे, अशोक बिराजदार, खजिनदार रावसाहेब भोसले, नितीन बेणकर, संजय मोरवळे, प्रदीप शिंदे, आनंद वाईकर, सोलापूर जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश मोहिते, बंडू पवार, उदय पाटील, ज्ञानदेव पवार, विजय पाटील, मारुती मासाळ आदी उपस्थित होते. 

श्री. काळे म्हणाले, ""सहकारी साखर कारखान्यांच्या प्रगतीत आणि विकासात साखर कामगारांचे तितकेच योगदान आहे. परंतु, साखर कामगारांकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदारांचे दुर्लक्ष होत आहे. महाराष्ट्रात सुमारे 450 कोटींचे वेतन थकीत आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडे कोट्यवधी रुपयांचे वेतन गेल्या वर्षभरापासून थकीत आहे. थकीत वेतनामुळे साखर कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामागारांच्या प्रश्‍नांकडे सरकारचेही दुर्लक्ष आहे. वेतन वाढीसंदर्भात त्रिपक्षीय समितीची स्थापन करावी अशी मागणी केली आहे. परंतु, अद्याप सरकारने ही समिती स्थापन केली नाही. सरकार साखर कामगारांच्या प्रश्‍नांसंदर्भात वेळकाढूपणा करत आहे. यापुढे अन्याय सहन करणार नाही. कामगारांच्या प्रश्‍नांसंदर्भात वेळ पडली तर सरकार आणि साखर कारखानदारांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा श्री. काळे यांनी यावेळी दिला. यावेळी अशोक बिराजदार, बंडू पवार आदींचे भाषण झाले. मेळाव्यास जिल्ह्यातून साखर कामगार मोठ्या संख्येने हजर होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com