संघटना मोडीत काढाल तर खबरदार - हनुमंत ताटे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

कोल्हापूर - महाराष्ट्र एसटी कामगार संघटना मोडीत काढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुंमत ताटे यांनी आज येथे दिला. सातव्या वेतन आयोगासाठी बेमुदत संपावर जाण्याची तयारी ठेवा. त्यापूर्वी करण्यात येणारे असहकार आंदोलन व राज्यव्यापी मोर्चा यशस्वी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोल्हापूर - महाराष्ट्र एसटी कामगार संघटना मोडीत काढण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुंमत ताटे यांनी आज येथे दिला. सातव्या वेतन आयोगासाठी बेमुदत संपावर जाण्याची तयारी ठेवा. त्यापूर्वी करण्यात येणारे असहकार आंदोलन व राज्यव्यापी मोर्चा यशस्वी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व इंटरनॅशनल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स फेडरेशनच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यव्यापी महिला व युवक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे होते. मार्केट यार्डमधील राजर्षी शाहू सांस्कृतिक मंदिरमध्ये हा मेळावा झाला. यासाठी राज्यातून मोठ्या संख्येने कर्मचारी आले होते. मेळाव्याचे उद्‌घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांच्या हस्ते झाले.

श्री. ताटे म्हणाले, ‘‘संघटना मोडीत काढण्याची भाषा करणारे अनेक जण संपले. आताही तोच प्रकार सुरू आहे; पण कामगारांनी कामगारांसाठी चालविलेली ही संघटना आहे. वडील, मुलगा आणि नातू अशा तीन पिढ्या या संघटनेचे कार्यकर्ते आहेत. राजकीय पक्षाने राजकारणाच्या सोयीसाठी चालविलेली ही संघटना नाही. अनेकांनी आजपर्यंत पदाधिकारी फोडून संघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला. त्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आजही तोच प्रकार सुरू आहे; पण संघटना सोडून गेलेले आणि त्रास देणारे संपले. संघटना आहे त्या ठिकाणीच महामंडळात असणाऱ्या वीस संघटनांमध्ये आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहे. काही संघटनांनी कामगारांना खोटी आश्‍वासने देऊन अर्ज भरून घेण्यास सुरवात केली आहे. त्या संघटनांना सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आपण बेमुदत बंद पुकारला आहे. त्याची तारीख अद्याप निश्‍चित झालेली नाही. संप किंवा बंद हे आंदोलनाचे अंतिम हत्यार आहे. ते करण्यापूर्वी पहिल्या टप्प्यात या महिन्यामध्ये असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे काही नवीन नियम करण्यात आले आहेत. ते रद्द करण्याची आमची मागणी आहे. त्यासाठी ‘प्रवासी कमी, नोकरीची हमी’ याप्रमाणे काम करावे लागेल. जानेवारी महिन्यात राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक आगारमध्ये द्वारसभा होतील.’’ 

राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे यांनी संघटनेच्या आंदोलनात यापुढे महिला आघाडीवर असतील, अशी ग्वाही दिली. कोषाध्यक्ष अनिल श्रावणे, प्रवासी संघटनेचे दीपक चव्हाण, केंद्रीय कार्याध्यक्ष सदाशिव शिवणकर यांचीही भाषणे झाली.

संदीप शिंदे म्हणाले, ‘‘कामगार चळवळ दाबण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहे. एसटी महामंडळात हिटलरशाही सुरू आहे. कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा रोज एक आदेश काढण्याचा सपाटा सुरू आहे. त्याच्या विरोधात बोलणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी मजबूत संघटन आवश्‍यक आहे. ती जबादारी आपण सर्वांनी स्वीकारावी. संघटनेचे काम करत असताना जर एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून कमी केले तर संघटना त्याची संपूर्ण जबाबदारी घेईल.’’ 

कार्यक्रमास कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष उत्तम पाटील, सचिव वसंत पाटील, प्रदेश सचिव शिवाजी देशमुख, विभागीय उपाध्यक्ष अरुणा पाटील, राजेंद्र ठोंबरे आदी उपस्थित होते. या वेळी कर्मचाऱ्यांचा व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रेरणा खरे यांनी मानले. सूत्रसंचालन राजलक्ष्मी सुर्वे यांनी केले.

राज्य सरकार तोट्यातच
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देताना तोट्याचे कारण सांगितले जाते. महाराष्ट्र सरकार कुठे फायद्यात आहे? ते देखील तोट्यातच आहे. राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना तोट्याचे कारण सांगितले जात नाही. त्यामुळे ज्या दिवशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होईल, त्या दिवशी बेमुदत संपाबाबत निर्णय घेतला जाईल, असे श्री. ताटे यांनी सांगितले.

Web Title: warning by hanumat tate