बसमधील टवाळखोरांवर पोलिसांचा वॉच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

कोल्हापूर - बसमधील गर्दीचा फायदा घेऊन तरुणींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना आता लगाम घालण्याचा उपक्रम करवीर पोलिसांनी हाती घेतला आहे. हद्दीतील एस.टी. व ‘केएमटी’ बसमधून साध्या गणवेशातील पोलिसांनी आता टवाळखोरांवर वॉच ठेवण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर पालकांसमवेत मुला-मुलींचे समुपदेशन करण्याचाही प्रयत्न त्यांच्याकडून सुरू झाला आहे. 

कोल्हापूर - बसमधील गर्दीचा फायदा घेऊन तरुणींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना आता लगाम घालण्याचा उपक्रम करवीर पोलिसांनी हाती घेतला आहे. हद्दीतील एस.टी. व ‘केएमटी’ बसमधून साध्या गणवेशातील पोलिसांनी आता टवाळखोरांवर वॉच ठेवण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर पालकांसमवेत मुला-मुलींचे समुपदेशन करण्याचाही प्रयत्न त्यांच्याकडून सुरू झाला आहे. 

बोंद्रेनगर धनगरवाड्यातील गीता बोडेकर हिने छेडछाडीस कंटाळून केलेल्या आत्महत्येचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. छेडछाडीविरोधात तक्रार देण्यासाठी सहसा मुली अथवा त्यांचे पालक पुढे येत नाहीत. परिणामी वेळेत कारवाई करता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सध्या एस.टी. आणि ‘केएमटी’मधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना गर्दीचा फायदा घेऊन छेडण्याचा प्रयत्न होतो. अशा तक्रारी पोलिसांच्या बैठकीत महिलांतून पुढे आल्या. त्याची दखल घेत शाळा महाविद्यालये सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेस बसमधील टवाळखोरांना लगाम घालण्यासाठी करवीर पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. 

मोहिमेची सुरवात खुद्द पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनीच केली. गेले आठ दिवस ते भोगावती ते हळदी या रस्त्यावरील वेगवेगळ्या बसमध्ये साध्या वेशात प्रवासी म्हणून प्रवास करतात. त्या बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मुलींची छेड काढण्याचा अगर जास्त आगावूपणा करणाऱ्याला रंगेहात पकडण्यास सुरवात केली आहे. अशा टवाळखोराला पोलिसी भाषेतच खडसावयाचे नाही तर पालकांना बोलावून त्यांच्यासमोर त्याचे कारनामे सांगण्याचा उपक्रम अधिकच पचणी पडू लागला आहे. टवाळी करणारा मुलगा ‘साहेब, पुन्हा असे करणार नाही. मी तिला बहीण मानतो. आई-बाबा मला क्षमा करा...’ अशा विनवण्या करत चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड लिहून देऊ लागला आहे. त्यामुळे बसमधील छेडछाडीच्या प्रकाराला चांगलाच लगाम बसला आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत विद्यार्थिनी व पालकांतून होत आहे. हा उपक्रम येथून पुढे अचानक राबविला जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी करवीर पोलिस ठाण्यामार्फत मुला-मुलींसमवेत पालकांचे समुपदेशन केले जात आहे. छेडछाडीविरोधात मुलींनी व त्यांच्या पालकांनी तक्रार देण्यासाठी निर्भीडपणे पुढे यावे. 
- दिलीप जाधव, पोलिस निरीक्षक, करवीर पोलिस ठाणे

Web Title: Watch the police bus tavalakhor