अबब ! साताऱ्यात पाणी बिल चक्‍क 71 हजार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आपला कारभार सुधारायचे काही केल्या नाव घेत नाही.

सातारा : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आपला कारभार सुधारायचे काही केल्या नाव घेत नाही. बिले काढण्याचे टेंडर ठेकेदारांना दिले जात असल्याने ग्राहकांना कधी कोणता झटका बसेल, याचा काही नेम नाही. येथील एका ग्राहकाला चार महिन्यांचे घरगुती पाणी बिल तब्बल 71 हजार रुपये आले आहे. इतरही ग्राहकांची अशीच ओरड असून, त्यांनाही किमान दोन हजारांवर बिले आली आहेत. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सातारा शहर व परिसरातील काही भागांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र, पाइपलाइनला गळत्या असणे, दूषित पाणीपुरवठा, बिले वेळेत न मिळणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, पाणी न येणे आदी कारणांनी सातत्याने या प्राधिकरणाचा कारभार चर्चेत असतो. मागील ठेकेदाराची बिले काढणे, वसुली करण्याची घडी बसली नाही, तोपर्यंत आता नवीन ठेकेदाराचेही "मागील पाढे पंचावन्न' या म्हणीनुसार कारभार सुरू झालेला आहे. 

एप्रिल ते जुलै या महिन्यांची पाणी बिले नुकतीच ग्राहकांना देण्यात आली आहेत. या बिलांनी मात्र ग्राहकांना चांगलाच झटका बसला आहे. सप्टेंबर महिना सुरू असताना एप्रिल ते जुलैपर्यंतची बिले दिली आहेत. तब्बल दीड महिना उशिरा बिले काढली आहेत. बहुतांश बिलांवर "टेम्पर' असे लिहिले आहे. योग्यरित्या मीटर रिडिंग घेतले जात नसल्याने बहुतांश ग्राहकांना या महिन्यात अव्वाच्या सव्वा बिले वाढवून आली आहेत. येथील एका ग्राहकाला तर चार महिन्यांचे तब्बल 71 हजार रुपयांचे बिल आले आहे. असे अनेक ग्राहक सध्या प्राधिकरण कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक, मानसिक त्रास होत असला तरी तेथील अधिकारी केवळ हात वर करून जबाबदारी झटकत आहेत. 

"शून्य रिडिंग'चा उतारा 

अव्वाच्या सव्वा बिले आली असल्यामुळे काही जणांच्या बिलात बदल करून ती बिले कमी केली जात आहेत. अन्यथा शून्य रिडिंग करून आणण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, ठेकेदाराच्या अनागोंदी कारभारामुळे "प्राधिकरणा'चेही त्यामध्ये नुकसान होत आहे. 

""ठेकेदारांच्या घोळामुळे बिले वाढवून आली आहेत. अधिकारी प्रत्येक जागेवर जावून आपले काम न करता ग्राहकांना ही बिले भरावी लागेल असे सांगत आहेत. ग्राहकांना आर्थिक तोटा होत असून, ते थांबले नाही तर आंदोलन करणार आहे.'' 

- शंकर माळवदे, माजी उपाध्यक्ष, सातारा पालिका 
 

""बिले वाढवून आली असतील तर त्यात दुरुस्ती करून देत आहोत. एजन्सी बदलली असल्याने "डाटा'मध्ये फरक झाले आहेत. मागील बिले भरली असतानाही कमी करणे राहिलेली आहेत. ग्राहकांच्या अडचणी जाणून त्यानुसार उपायोजना करत आहोत.'' 

- पल्लवी मोटे, सहायक कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सातारा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water bill charged of rupee 71 thousand