परखंदळेत ५ रुपयाला एक घागर पाणी

अमर पाटील 
सोमवार, 22 मे 2017

‘ठेकेदारास वारंवार संपर्क करूनदेखील ठेकेदार पेयजल योजनेचे काहीच काम करण्यास तयार नाही. फोन केला असता फोनही घेत नाही. गावातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यासाठी नवीन योजना मंजूर करून नदीच्या पाण्याची योजना आणली तरच पाण्याचा प्रश्न सुटेल.
- आनंदा चव्हाण, सदस्य  ग्रा. पं. , सचिव, पेयजल समिती परखंदळे.

बांबवडे - परखंदळे (ता. शाहुवाडी) येथील ४६ लाख रुपयांची पेयजल योजना असफल झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.  एक घागर ३ ते ५ रुपये तर एक बॅरेल ६० ते १५० रुपयेपर्यंत माेजावे लागत आहेत. 

परखंदळे येथील पिण्याच्या पाण्याची पेयजल योजना अर्धवट आहे. ज्या ठिकाणी शासनाच्या जलतज्ञांनी विहीर खोदण्यास जागा दाखवली ती जागा ग्रामपंचायत एक लाखाला    विकत घेऊन विहीर खोदली, पण  एक ही थेंब पाणी लागले नाही. ठेकेदाराने पहीला हप्ता १६ लाख रूपये उचलून विहीर पूर्ण केली, पण विहिरीस पाणी न लागल्याने  पुढचे काम मात्र अर्धवट राहीले.  

परखंदळे गावास पिण्याच्या पाण्याचा इत्तर कोणताही स्त्रोत नाही. म्हाणडालाई देवी जवळच्या झऱ्याचे   पाणी पिण्यासाठी उपलब्ध होत होते. परंतु तेथील शेतकर्यांनी निलगिरीची झाडे लावल्याने येथील पाणी ही बंद झाले आहे . गावाजवळ एक ही पाझर तलाव अथवा पाण्याचा मोठा साठा नाही त्यामुळे माणसांच्या  व जनावरांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आशा परिस्थितीत गावातील काही लोकांच्या बोअरवेल आहेत. ते लाईट बिलाचे पैसे घेऊन चार- चार घागरी देतात पण त्या ही बोअरवेलला पुरेसे पाणी नसल्याने समस्या निर्माण होते. गावातील ट्रॅक्‍टर मालकांनी पाण्याच्या टॉक्‍या तयार करुन घेतल्या आहेत. त्या बाहेर गावाहून पाणी आणुन गावामध्ये पाच रुपयेला एक घागर तर साठ रूपयेला एक बॅरेल विकतात. तर गावाच्या टेकावर एक बॅरेल १५० रुपयेला पडतो.    सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लग्नात पाण्यासाठी ५ ते ६.हजार मोजावे लागतात. त्यामुळे या गावातील लोकांना पैसे मोजून पाणी प्यावे लागत आहे. या गावातील या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कोणीही  नेता फिरकत नसल्याचे   लोक सांगतात. दरम्यान   प्रशासनाने पाण्याचा टॅंकर सुरू करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Water for a bucket of 5 rupees