आमीरला होकार; नानाला नकार

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 26 मे 2018

सभागृहनेते संजय कोळी यांनी विनंती केल्यामुळे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अक्षयकुमार आणि सयाजी शिंदे यांचा प्रस्ताव तूर्त मागे ठेवण्याचा निर्णय घेतला. जूनच्या सभेत या चौघांना मानपत्र देण्याचा स्वतंत्र प्रस्ताव देणार आहे. 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक, शिवसेना

सोलापूर : ज्येष्ठ अभिनेते आमीर खान यांना मानपत्र देण्याचा ठराव करतानाच शिवसेना, बसप आणि एमआयएमच्या वतीने मानपत्रासाठी आलेले प्रस्ताव मात्र फेटाळण्यात आले. त्यामध्ये "नाम' संस्थेचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अभिनेता अक्षयकुमार, सयाजी शिंदे, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी आणि दोन संस्थांचा समावेश होता. 

सत्यमेव जयते आणि वॉटर कप उपक्रमातून 10 हजार कोटी लिटर पाणी साठविण्याची किमया साध्य केल्याबद्दल अमीर खान यांना सोलापूर महापालिकेतर्फे मानपत्र देण्याचा प्रस्ताव होता.  नाम संस्थेचे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे, कोट्यवधी रुपयांची मदत करणारे अभिनेते अक्षयकुमार, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले अभिनेते सयाजी शिंदे यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे गुरुशांत धुत्तरगावकर यांनी,  स्वच्छतेसाठी वाहून घेतलेले धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचा प्रस्ताव बसपचे आनंद चंदनशिवे यांनी तर  एमआयएमचे रियाज खरादी यांनी, दुष्काळमुक्तीसाठी काम करीत असलेले जैन सोशल ग्रुप आणि स्वच्छता व राष्ट्रीय एकात्मता क्षेत्रात कार्य करणाऱ्या जमात-ए-उलमा-ए-हिंद या संस्थांनाही मानपत्राने गौरवावे असा प्रस्ताव दिला. 

मानपत्राच्या प्रस्तावांची संख्या वाढू लागल्याने त्यावर सभागृहात प्रतिक्रियाही उमटल्या. मानपत्र देण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र ज्यांना आपण मानपत्र देतोय, ती व्यक्ती किंवा संस्था ते स्वीकारण्यास तयार आहेत का? अभिनेते मानपत्र घेण्यासाठी येणार का? यापूर्वी अनेक वरिष्ठ अधिकारी आणि अभिनेत्यांना मानपत्र देण्याचे ठराव एकमताने झाले आहेत, अद्याप त्याचे वितरण झाले नाही. अशा स्थितीत मानपत्राच्या प्रस्तावावरून सभागृहात चर्चा करून वेळ घालविणे योग्य होणार नाही, असाही सूर निघाला. या प्रस्तावावरून गोंधळ सुरू असतानाच महापौर शोभा बनशेट्टी यांनी भाजपची सूचना मंजूर करीत केवळ आमीरखान यांच्या मानपत्राचा प्रस्ताव मंजूर केल्याची  घोषणा केली. 

सभागृहनेते संजय कोळी यांनी विनंती केल्यामुळे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अक्षयकुमार आणि सयाजी शिंदे यांचा प्रस्ताव तूर्त मागे ठेवण्याचा निर्णय घेतला. जूनच्या सभेत या चौघांना मानपत्र देण्याचा स्वतंत्र प्रस्ताव देणार आहे. 
- गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक, शिवसेना

Web Title: water cup celebration in Solapur