पाचगावला चार दिवसांतून एकदा पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

पाणी साठवण्याची अपुरी क्षमता, पाइपलाइनला ठिकठिकाणी असणारी गळती आणि पाणी वितरणातील नियोजनाचा अभाव यांमुळे पाचगाव (ता. करवीर) येथे चार दिवसांतून एकदा कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अजून उन्हाळ्याचे दोन महिने असून आताच ही परिस्थिती असल्याने येथून पुढे पाण्याची काय अवस्था होईल या विचारानेच पाचगावकर धास्तावले आहेत.

कळंबा - पाणी साठवण्याची अपुरी क्षमता, पाइपलाइनला ठिकठिकाणी असणारी गळती आणि पाणी वितरणातील नियोजनाचा अभाव यांमुळे पाचगाव (ता. करवीर) येथे चार दिवसांतून एकदा कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अजून उन्हाळ्याचे दोन महिने असून आताच ही परिस्थिती असल्याने येथून पुढे पाण्याची काय अवस्था होईल या विचारानेच पाचगावकर धास्तावले आहेत.

पाचगावच्या पाचवीला पूजलेला हा पाणी प्रश्‍न केव्हा निकालात निघणार, असा येथील नागरिकांचा प्रश्‍न आहे. राजकीय स्वार्थापोटी इथल्या पाणी प्रश्‍नाचं राजकारण करायचं आणि निवडणुका संपल्या की विसरून जायचं, या नेत्यांच्या वृतीची इथल्या नागरिकांना आता सवयच झाली आहे. यंदा मार्चच्या सुरवातीलाच पाचगावकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. येथे सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून रोज बारा लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो; पण हे पाणी साठावण्यासाठी दोनच टाक्‍या आहेत. त्या पूर्ण क्षमतेने भरल्या, की गावात पाणीपुरवठा होतो. पाचगावची लोकसंख्या सुमारे 25 हजार असून, येथे 65 पेक्षा अधिक छोट्या-मोठ्या कॉलन्या आहेत. प्रत्येक कॉलनीला चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांना "पाणी पाणी' करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीतर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाणी वाढवून मिळावे, अशी मागणी करणार आहे, असे ग्रामसेवक डी. डी. शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Water distributed after four days in Pachgaon