जलसंधारणाचा इंदापूर पॅटर्न झाला 'हिट'

indapur.
indapur.

इंदापूर - तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच कमवा व शिका योजनेतील 110 विद्यार्थ्यांनी मागील वर्षी जलदुत म्हणून काम केल्याने यंदा तीव्र  उन्हाळात सुध्दा तालुक्यात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. यंदा महाविद्यालयाचे जलदुत संपुर्ण राज्यात जलसंधारणाचे काम करत असल्याने राज्यात इंदापूर पॅटर्न प्रसिध्द  झाला आहे. 

करिअर करणा-या विद्यार्थ्यांना समाजवाचनाचे शिक्षण यामुळे मिळाल्याने त्यांचे सकारात्मक योगदान तालुक्याच्या टॅंकरमुक्तीचा पाया बनला. त्यावर कळस चढवायचे काम ग्रामस्थांनी श्रमदानातून केल्यामुळे गावे पाणीदार झाली. त्यामुळे प्रशासनावरील अतिरिक्त ताण टळला असून जलदुतांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरवर्षी पावसाळा येतो. मात्र पडलेल्या पाऊसाचे पाणी अडवण्यासंदर्भात योग्य प्रयत्न होत नसल्यामुळे निरा व भिमा नद्यांच्या खो-यात वसलेल्या तसेच शेजारी उजनी धरण असताना देखील तालुक्यात काही भागात पाणी टंचाई जाणवते. त्यामुळे प्रशासनास टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. मागील वर्षी पाच तर त्यापुर्वी टॅंकरची संख्या 20 पर्यंत होती. त्यामुळे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकूंद शहा यांनी जलतज्ञ डॉ. अविनाश पोळ यांच्याशी संपर्क साधून माजी सहकार मंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय जलसंधारणासाठी विशेष योगदान देवू इच्छित असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ. पोळ, पाणी फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक सत्यजित भटकळ यांची महाविद्यालयात सचिव मुकूंद शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, इंदापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, माजी अध्यक्ष डॉ. संदेश शहा, संजय दोशी, पद्मसिंह जाधव यांच्यासमवेत सविस्तर चर्चा करून कामाचा आराखडा तयार केला. 

यासाठी समन्वयक म्हणून प्रा. रोहित लोंढे, प्रा. महंमद मुलाणी तसेच राजकुमार माने यांची निवड झाली. पहिल्या चार दिवसाच्या निवासी प्रशिक्षणात त्यांना जल व मातीसंवर्धन प्रशिक्षण तर दुस-या टप्प्यात त्यांनी 110 विद्यार्थी जलदुतांना हे प्रशिक्षण दिले. तालुक्यातील टंचाईग्रस्त 24 गावांमध्येमहाविद्यालयाचे पाच जलदूत गेले. त्यांनी पथनाट्य, सुसंवादाव्दारे गावक-यांना पाणी हे जीवन आहे पटवून दिले. त्यानंतर तिस-या टप्प्यात जलदुतांनी ग्रामस्थासमवेत 45 दिवस श्रमदान केले. त्यामुळे टॅंकर बंद झाले.तत्पुर्वी तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शहा सांस्कृतिक भवन तसेच पंचायत समिती सभागृहात राज्याचे मुख्य समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्ग- दर्शनाखाली जलसंवर्धन मार्गदर्शन शिबिर पार पडले. 

त्यानंतर महाराष्ट्र व कामगार दिनी महाश्रमदान शिबिरात पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर, कल्याण येथील 7500 स्वयंसेवकांनी घोरपडवाडी, तक्रारवाडी, निरगुडे, शेटफळगडे, गोतोंडी गावांमध्ये उच्चांकी श्रमदान केले. यावेळी कुदळ व फावड्याचा अनोखा विवाह सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आमदार भरणे, माजीसहकार मंत्री पाटील, तहसिलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, तालुका कृषी अधिकारी सुर्यभान जाधव, सिनेअभिनेते सुनील बर्वे, अतुल कुलकर्णी, अनिता दाते, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, शहराध्यक्ष धरमचंद लोढा, नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी ग्रांमस्थाबरोबर श्रमदान केले. भारतीय जैन संघटनेने टंचाईग्रस्त गावांना 100 तासासाठी पोकलेन उपलब्ध करून दिला तर घोरपडवाडी येथे अॅग्रीकल्चरल डेव्हलेपमेंट ट्रस्ट विश्वस्त सौ. सुनंदा पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केले. सकाळ माध्यम समूहाने निरनिमगावला दोन लाख रूपये जलसंधारणासाठी दिले. उद्योजक श्रीनिवास पवार तसेच शरयू फौंडेशनच्या विश्वस्त शरयू पवार यांनी तालुक्यात ओढा खोलीकरण व रूंदीकरणास सहकार्य केले. जिल्हा परिषदेने अनेक गावात तर जनकल्याण समितीने वडापुरी येथे ओढा खोलीकरण व बंधा-यासाठी मदत केली. घोरपडवाडीत बांधबंदिस्ती, ओढाखोलीकरण व रुंदीकरण, शेटफळगढे येथे सोळामातीनाला बांध, तक्रारवाडी येथे सलगसमपातळीचर, दगडी बांध, ओढा खोलीकरण, रूंदीकरण, निरगुडे येथे बांधबंदिस्ती, ओढा खोलीकरण व रुंदीकरण, निरनिमगाव येथे ओढा खोलीकरण, गाळकाढणे, कळस येथे सलग समपातळीचर, अनघड दगडी बांध, अकोले येथे सलग समपातळी चर, ओढा खोलीकरण व रुंदीकरण, वडापुरी येथे सलग समपातळीचर, ओढा खोलीकरण, कडबनवाडी येथे सलग समपातळीचर, अनघड दगडी बांध, बिरगुंडी येथे सलग समपातळीचर, दगडवाडी येथे बांध बंदिस्ती, ओढा खोलीकरण व रुंदीकरण आदी कामे लोकसहभाग व श्रमदानातून झाली.

त्यात पावसाळ्यात पडलेल्यापावसा मुळे तुडूंब पाणी साचले. त्यामुळे उन्हाळ्यातील उभ्या पीकांना पाणी कमी पडले नाही. जलदुत विद्यार्थीना पाणी उपलब्ध असेल तर शेती फायद्याची होते या अर्थक्रांतीचा अनुभव आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com