गोडोलीतील गळती थांबता थांबेना!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

गोडोली - परिसरात पाणीगळती थांबता थांबत नाही. तात्पुरती एका ठिकाणची गळती थांबली की, दुसरीकडे गळती सुरू होते. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात असून, पाण्यामुळे रस्त्यांत खड्डे पडून मोठे नुकसान होत आहे.

गोडोली - परिसरात पाणीगळती थांबता थांबत नाही. तात्पुरती एका ठिकाणची गळती थांबली की, दुसरीकडे गळती सुरू होते. त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात असून, पाण्यामुळे रस्त्यांत खड्डे पडून मोठे नुकसान होत आहे.

एसटी कॉलनी, अजिंक्‍यतारा रोड, जगतापनगरमधील रस्त्यांवर पाणीगळती वाढत चालल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे. वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. साई मंदिर ते अजिंक्‍यतारा रस्त्यावरील कमानीजवळील रस्त्यात झालेली पाण्याची गळती काढण्यासाठी स्थानिकांनी पाठपुरावा केल्यामुळे पाणी गळतीचे काम झाले असले तरी बीएसएनएल कार्यालयाजवळ झालेली पाणीगळती पाच वेळा काढली तरी थांबता थांबत नाही. या सर्व प्रकारामुळे रस्त्यात मोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांचे व नागरिकांचे हाल सुरू आहेत. 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लोकांचा रेटा लक्षात घेऊन गोडोली कमानीच्या पश्‍चिमेकडे पाणीगळती काढण्यासाठी जेसीबीच्या साह्याने मुख्य जलवाहिन्यातील दोष काढण्यासाठी प्रयत्न केले. लोखंडी मोठ्या जलवाहिन्यांना जेथे जेथे पाण्याची नव्याने कनेक्‍शन दिली होती आणि दोन जलवाहिन्या जेथे जेथे जोडलेल्या आहेत, तेथूनच पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यासाठी संबंधितांनी योग्य त्या पद्धतीने प्रयत्न केले. मात्र, त्यासाठी रस्त्याचे पूर्ण खोदकाम केल्याशिवाय पर्याय नव्हता. या रस्त्याची वाहतूक दोन्ही बाजूने इतरत्र वळवली आहे.

कमानीजवळची गळती काढताना अजिंक्‍यतारा रस्त्यावरील पश्‍चिमेकडील चौकापर्यंत दहा फुटांच्या अंतरात जागोजागी पाणीगळती सुरू आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मागचा ससेमिरा संपत नाही. त्याच पद्धतीची गळती एसटी कॉलनी, जगतापनगरमधील रस्त्यांवर अधूनमधून सुरू असते.

प्राधिकरणाकडे मनुष्यबळाचा तुटवडा व इतर साधनसामुग्री अपुरी असल्याने त्यांचाही अनेकदा नाईलाज होतो. पण, त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण दरवेळेला पाणी गळतीसाठी रस्ता खोदल्यामुळे रस्त्याचे नुकसान होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे. सद्य:स्थितीत साईमंदिर चौक ते अजिंक्‍यतारा हा रस्ता नव्याने होणार असल्यामुळे या रस्त्यावरील सर्व पाणीगळती कायमस्वरूपी काढून नवीन रस्ता करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

प्राधिकरणासह नागरिकांना फटका
पाणीगळतीची समस्या ही संबंधित ठेकेदाराने चांगले काम न केल्यामुळे होत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. मात्र, त्याचा फटका हा प्राधिकरण आणि नागरिकांना बसतो आहे. 

Web Title: Water Leakage