तारळीची गळती थांबणार कधी?; भिंतीलगतच्या गावात घबराट, 

dam
dam

तारळे : चिपळुण तालुक्यातील तिवरे धरण फुटुन नागरीकांना जलसमाधी मिळाली. नागरीकांच्या धरणाच्या गळतीच्या डागडुजीच्या मागणीकडे अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे दुदैवी घटना घडली. तीच स्थिती तारळीची असुन अनेक वर्षे गळती रोखण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. तिवरेच्या घटनेने तारळीचा गळतीचा मुद्दा ऐरणीवर आला असुन भिंती नजीकच्या मुरुड व तोंडोशी गावातील नागरीक भितीच्या छायेत जगत असुन एखादी रात्र आपली काळरात्र ठरु नये अशी भीतीने सर्वांना ग्रासले आहे. भय इथले संपत नाही असे म्हटले तर वावगे ठरु नये. धरणाची गळती रोखण्यच्या मागणीने जोर धरला आहे.

5.85 टिएमसी क्षमतेचे तारळी धरण युती काळात मंजुर झाले. 1998 साली प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात झाली. सुरुवाती पासुनच काम वादात राहिले. प्रदीर्घकाळाने 2013 साली लोकार्पण सोहळा पार पडला. त्यापासुनच धरणाला गळतीचे ग्रहण लागले आहे. धरणाच्या सर्व्हीस गेटच्या बाजुला गळतीचा मोठा प्रवाह बारा महिने चोवीस तास सुरु आहे. धरणाच्या भिंतीतुनही अनेक ठिकाणी पाणी पाझरत आहे, तर काही ठिकाणी कारंजी सारखे पाणी उडत आहे. या गळतीने धऱणाच्या भिंतीला शेवाळे चढले आहे. गेली अनेक वर्षे हि गळती अव्याहतपणे सुरु आहे. हे अधिकारी व लोकप्रतिनिधींनीही मान्य केले आहे. मात्र त्यांना या गळतीवर पुर्ण नियंत्रण मिळविण्यात अपयश आले हे वास्तव आहे. 

तीन वर्षांपुर्वी धरणाची पाण्याकडील भिंतीच्या बांधकामाचे निकृष्ठ दर्जाचे भीषण वास्तव समोर आले होते. अनेक ठिकाणी भिंतीतील दगड उघडे पडुन लहान मोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास आले. वाळु व सिमेंट दिसुन येत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. त्यावेळी सिमेंटचा मुलामा देउन त्याची मलमपट्टी केली होती. यामुळे धरणाची सुरक्षितता धोक्यात येउन अधिकारी व ठेकेदार लोकांच्या जीवाशीच खेळत असल्याचे यातुन उघड झाले होते. त्यामुळे धरणाला गळतीबरोबरच निकृष्ठ बांधकामाचीही जोड मिळाल्याचे दिसुन आले होते. दोन वर्षांपुर्वी धरणाचे क्वीक सर्व्हीस गेट तुटुन मोठी गळती झाली होती. पंधरा तासांच्या अथक प्रयत्नांनी गळती थांबविण्यात अधिकाऱ्यांना यश आले होते. धरणाच्या या घटनांनी स्थानिकांच्या काळजात धस्स होत आहे. तिवरे धऱणाच्या दुर्घटनेनंतर येथील लोकांना पुन्हा एकदा काळजीने घेरले आहे. 

मधल्या काळात विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळयात तारळी धरणाचाही उल्लेख केला होता. त्यांनी हे धरण निकृष्ठ असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एका कमिटीने येउन बांधकामाचे परिक्षण करुन धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला होता. परंतु आजतागायत सुरु असलेली गळती कशाचे ध्योतक आहे. हि गळती थांबणार कधी ? गळती दिसु नये म्हणुन भिंतीलगत असलेल्या मातीच्या टेकडया अजुनही का ? हटविल्या नाहीत असे प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत. अधिकाऱ्यांनी गेली काही वर्षे ग्राउटींग द्वारे गळती थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यातुन बहुतांशी गळती थांबविल्याचा युक्तीवाद अधिकारी व लोकप्रतिनिधी कऱतायत मात्र पुर्ण गळती थांबविण्यात अपयश आले आहे हे धक्कादायक वास्तव आहे. हे अपयशच काळजीत भर घालणारे ठरत असुन धरण किती काळ तग धरणार हा मोठा प्रश्नच आहे. 
चौकट 

पाल यात्रेच्या तोंडावर झालेल्या गळतीवेळी तत्कालिन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलिस अधिक्षक संदिप पाटील प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी धरणाला भेट दिली होती. त्यावेळी धऱणाच्या गॅलरीतुन सर्व मान्यवर गेले होते. आतील गळतीचीही भय़ावह स्थिती समोर आली होती. मात्र गळतीच्या दुर्लक्षाने दुर्घटना उदभवलीच तर तोंडोशी, मुरुड, धुमकवाडी, आवर्डे, धनगरवाडी, आंबळे, तारळे, राहुडे आदी गावांसह कराड तालुक्यातील पाल उंब्रज पर्यंतच्या नदीकाठच्या गावांना व हजारो नागरीकांना झळ पोहोचण्याची शक्यता आहे. 

तारळी धरणाचे काम सुरूवाती पासुनच निकृष्ठ झाले आहे. त्याचे पुरावे समोर आले आहेत. आमच्या उशाला धरण असल्याने सदोदीत भितीच्या छायेखाली वावरत असतो. धऱणाची कायमस्वरुपी गळती थांबवुन आम्हाला भयमुक्त करावे.
- नितीन माने, उपसरपंच, तोंडोशी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com