
पूराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.शिवाय शेकडो हेक्टर क्षेत्रावरील ऊस पीक पाण्याखाली गेले आहे. याचाही मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आज सकाळी भीमानदीत पात्रात 2 लाख 60 हजार क्यूसेक विसर्ग सुरु आहे. पाणी पातळी वाढल्याने पंढरपूर-विजयपूर,पंढरपूर-नगर आणि पंढरपूर- सोलापूर या तिन्ही प्रमुख मार्गावरील भीमानदीवरील पुल पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील 31 गावांना पुराचा फटका बसला आहे. आता पर्यंत सुमारे 3058 बाधीत कुटुंबातील सुमारे 7हजार लोकांचे स्थलांतर केले आहे. स्थलांतरीत नागरिकांना प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती मदत दिली आहे.
पूराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.शिवाय शेकडो हेक्टर क्षेत्रावरील ऊस पीक पाण्याखाली गेले आहे. याचाही मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
सध्या उजनी धरणातून भीमानदीत 1 लाख 70 हजार क्युसेक तर वीर धरणतून नीरा नदीत 70 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या अनेक झोपडपट्यांमध्ये ही पाणी आली आहे. नागरिकांनी धोका पत्करून नदीपात्रात जावू नये असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.