मुळा धरणातून जायकवाडीत जाणारे पाणी बंद

मुळा धरणातून जायकवाडीत जाणारे पाणी बंद

राहुरी : मुळा धरणातून जायकवाडीसाठी सोडलेले पाणी आज (रविवारी) सकाळी दहा वाजता बंद झाले. एक हजार 908 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. पैकी एक हजार 500 दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला पोचले. 

धरणाचे अकरा पैकी सहा दरवाजे बंद करून, मुळा नदी पात्रातील चार बंधाऱ्यांसाठी पाच दरवाजांद्वारे दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. उद्या (सोमवारी) सकाळी सहा वाजता बंधाऱ्यांसाठी सोडलेले पाणीही बंद होईल. बंधाऱ्यांसाठी शंभर दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार आहे. जायकवाडीचे पाणी बंद होताच, बंधाऱ्यांमध्ये फळ्या टाकण्याची लगबग सुरू झाली. जलसंपदाचे अधिकारी, कर्मचारी आणि खोल पाण्यात जाऊन बंधाऱ्यांच्या फळ्या बसविण्यात तरबेज असलेल्या तरुणांचे पथक कार्यरत झाले.

डिग्रस बंधारा 67 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे. 560 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होतो.  मानोरी बंधारा 125 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे. 910 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होतो. मांजरी बंधारा 100 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे.  671 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होतो. वांजुळपोई बंधारा 107 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आहे. येथेही 930 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होतो. आज दुपारपर्यंत वांजुळपोई बंधाऱ्यात सात फळ्या टाकल्या आहेत. उर्वरित तीन बंधाऱ्यांमध्ये नऊ पैकी सहा फळ्या टाकण्याचे नियोजन आहे. साठ ते सत्तर टक्के बंधारे भरले जातील.

माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनी नदीपात्रात बंधाऱ्यांची मालिका उभी केली. त्यामुळे, ऐन दुष्काळात नदीकाठच्या गावांना पाण्याचा लाभ झाला आहे. चारही बंधाऱ्यांच्या खराब फळ्या मागील वर्षी बदलण्यात आल्या. त्यामुळे यंदा बंधाऱ्यांमधून पाणी गळती कमी होईल. किमान चार महिने पाणी पुरेल. अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com