महापालिका जलशुद्धीकरण केंद्रातून हवे पाणी

संतोष सिरसट
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पाकणीच्या सरपंच गुंड यांची मागणी
20 वर्षांपासून दिला नाही कोणताही कर 

 

सोलापूर- सोलापूर शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी पाकणी येथे जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी केली आहे. मात्र, महापालिकेने मागील 20 वर्षांपासून ग्रामपंचायतीस कोणत्याही स्वरूपाचा कर दिला नाही. तेव्हा आता पाकणी गावाला किमान पिण्यासाठी तरी पाणी द्यावे, अशी मागणी पाकणीच्या सरपंच शोभा गुंड यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली आहे.

सहकारमंत्री देशमुख एका कार्यक्रमानिमित्त पाकणी येथे आले असता सरपंच गुंड यांनी ही मागणी केली. पाकणी गावची गायरान जमीन महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला दिली आहे. त्यावर केंद्र उभारून सोलापूर शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, या जमिनीचा कर देणे महापालिकेने गरजेचे होते. पण, त्यावर महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने महापालिकेकडे चार-पाच वेळा पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, त्याला महापालिका प्रतिसाद देत नसल्याचेही सरपंच गुंड यांनी सांगितले. 

सहकारमंत्री देशमुख यांच्या कानावर हा विषय घातला आहे. त्यामुळे याचा काहीतरी सकारात्मक परिणाम होईल, अशी अपेक्षा आहे. जर पुन्हा महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना निवेदन देऊन जलशुद्धीकरण केंद्रात ठिय्या आंदोलन केले जाईल. वेळ पडली तर जलशुद्धीकरण केंद्राला कुलूप लावण्याचा इशाराही सरपंच गुंड यांनी दिला. 

पाकणी ग्रामपंचायतीच्या गायरानची जवळपास 35-40 एकर जमीन महापालिकेला दिली आहे. मात्र, त्याबदल्यात महापालिकेने कर दिला नाही. राष्ट्रीय महामार्गालगत त्या जागेवर व्यापारी गाळे बांधण्यासाठी महापालिकेने आम्हाला जागा द्यावी, अशी विनंतीही आम्ही करणार आहोत.  - शोभा गुंड, सरपंच, पाकणी

Web Title: Water from the municipal water purification center