पाण्याची डबकी अन्‌ ‘ट्रॅफिक जाम’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

सांगली - सांगलीत दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. तशात चौकाचौकांत वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे वाहनधारकांची त्रेधा उडाली आहे. पाण्याची तळी निर्माण झाल्यामुळे कोंडीतून वाट काढणे मुश्‍कील बनत आहे. वाहतूक पोलिसांना तर दुपारच्या सुटीतही ड्युटी बजवावी लागत आहे. सर्वत्र ‘ट्रॅफिक जाम’चा अनुभव येत आहे.

सांगली - सांगलीत दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. तशात चौकाचौकांत वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे वाहनधारकांची त्रेधा उडाली आहे. पाण्याची तळी निर्माण झाल्यामुळे कोंडीतून वाट काढणे मुश्‍कील बनत आहे. वाहतूक पोलिसांना तर दुपारच्या सुटीतही ड्युटी बजवावी लागत आहे. सर्वत्र ‘ट्रॅफिक जाम’चा अनुभव येत आहे.

सांगली, परिसरात दोन दिवसांच्या संततधारेमुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. महापालिकेच्या नाले आणि गटारी सफाई मोहिमेला अपयश आल्याचे चित्र सर्वत्र आहे. कारण पूर्वी जेथे पाणी साचत नव्हते तेथेही पाणी साचून तळी निर्माण झालीत. बसस्थानक परिसर, मारूती चौक, सिव्हिल हॉस्पिटल चौक, राजवाडा चौक परिसर, स्टेशन रस्ता, कॉलेज कॉर्नर परिसर, आपटा पोलिस चौकी परिसर, वखारभाग, हायस्कूल रस्ता, टिळक चौक आदी ठिकाणी पाणी साचून राहिले.

प्रमुख चौक आणि रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे. गाडीच्या इंजिनमध्ये पाणी जाऊन त्या बंद पडण्याचे प्रकार वाढले  आहेत. पाण्याच्या डबक्‍यांतून वाट काढणे मुश्‍कील बनत असताना दुसरीकडे वाहतुकीची कोंडीही होऊ लागली आहे. पावसाच्या थोड्याशा उघडिपीनंतर दैनंदिन कामासाठी नागरिक बाहेर पडतात. परंतु ‘ट्रॅफिक जाम’ मुळे वैताग सहन करावा लागत आहे.

कॉलेज कॉर्नर, सिव्हिल हॉस्पिटल, महापालिका परिसर, हरभट रस्ता, मारुती रस्ता, बसस्थानक परिसर, राम मंदिर परिसर, टिळक चौक येथे आज भर दुपारीच ट्रॅफिक जामचा अनुभव अनेकांना आला. वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसले. कोंडी  फोडण्यासाठी दुपारी एकनंतरही वाहतूक पोलिस रस्त्यावर दिसत होते. पावसामुळे दैनंदिन कामे वेळेत करण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू असताना त्यात ‘ट्रॅफिक जाम’ ची भर पडत आहे. वाहतूक पोलिसांचे नियंत्रणही काहीसे कोलमडले. पोलिसांवर संताप व्यक्त करायचा की पाण्याची डबकी साचण्यास कारणीभूत असणाऱ्या महापालिकेवर राग काढायचा अशी मन:स्थिती निर्माण झाली आहे.

गॅरेजवाल्यांचा धंदा तेजीत-
पावसाच्या पाण्यामुळे तसेच डबक्‍यातून गाडी काढताना इंजिनमध्ये किंवा प्लगमध्ये पाणी जाऊन गाड्या बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत.  त्यामुळे भिजत गाडी ढकलत नेऊन गॅरेजच्या दारातच उभी करावी  लागते. त्यामुळे भर पावसातही गॅरेजवाल्याचा धंदा तेजीत असल्याचे दिसून येते.

Web Title: Water ponds and 'traffic jams'