वीर धरणातून निरा नदीत सोडले पाणी

मनोज गायकवाड
रविवार, 22 जुलै 2018

यंदा चांगला पाऊस पडल्याने निरा खोऱ्यात समाधानकारक पाणीसाठा होऊ लागला आहे. गेल्यावर्षी ३० जुलैला नदीत पाणी सोडले होते. त्या तुलनेत यंदा आठ दिवस अगोदर नदीत पाणी सोडले आहे.

अकलूज (जि. सोलापूर) - वीर धरणात आज सायंकाळी ९७ टक्के पाणीसाठा झाला असून वीर मधून निरा नदीत ४ हजार ५६३ क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडले जात आहे. वीर मधील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कालव्यांसह नदीत पाणी सोडायला आजपासून सुरवात झाली असून नदीतीरावर काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यंदा चांगला पाऊस पडल्याने निरा खोऱ्यात समाधानकारक पाणीसाठा होऊ लागला आहे. गेल्यावर्षी ३० जुलैला नदीत पाणी सोडले होते. त्या तुलनेत यंदा आठ दिवस अगोदर नदीत पाणी सोडले आहे. आज सायंकाळी चार वाजता धरणात ९७ टक्के पाणीसाठा झाल्यावर धरण प्रशासनाने नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन ४ हजार ५६३ क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडायला सुरूवात केली आहे.  

निरा खो-यातील देवधर, भाटघर, वीर या धरणात यंदा चांगला पाणीसाठा होऊ लागल्याने शेतकरी वर्गातून समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे. २३ टीएमसी क्षमता असलेल्या भाटघर आणि १२ टीएमसी क्षमता असलेल्या देवधर धरणात आज सायंकाळी सुमारे ७४ टक्के तर वीरमध्ये ९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी वीरमध्ये ९०७० दलघङ्गू साठा होता त्या तुलनेत आज येथे ९४९७ दलघङ्गू पाणीसाठा आहे. वीरमध्ये आज ९७ टक्के पाणी असून उजव्या कालव्यातून १५५०, डाव्या कालव्यातून ८२७ तर नदीतून ४ हजार ५६३ क्युसेकसचा विसर्ग सुरू आहे. नदी आणि कालव्यात पाणी सोडून धरणाची पाणीपातळी नियंत्रित केली जात आहे. याचवेळी धरणात सुमारे पाच हजार क्युसेक्स वेगाने पाणी येत आहे. दरम्यान पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढला तर नदीत सोडले जाणारे पाणी वाढविले जाण्याची शक्यता आहे. यंदा चांगल्या पावसामुळे निरा नदीच्या सर्वच बंधाऱ्यात पाणी आहे. नदीत सर्वत्र पाणी असल्यामुळे धरणातून सोडले जाणारे पाणी गतीने पुढे सरकायला मदत होणार आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Water released from Veer dam to Neera River Akluj Solapur