आटपाडी तालुकाः पावसाने मारले, टॅंकरने तारले

सदाशिव पुकळे
रविवार, 2 डिसेंबर 2018

पैश्‍याची चणचण, मुलांना पूर्व, उच्च शिक्षणाला पैसे नाहीत, मग जगायचे कसे ? या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे. जगण्यासाठी शेतीचेच एकमेव साधन आहे. दहा-बारा वर्षांत पूर्ण क्षमतेने पाऊस पडला नाही. तरी देखील शेतकरी नमला नाही. द्राक्ष बागा जागविण्यासाठी दुष्काळाशी सामना करीत आहे.

झरे - आटपाडी पश्‍चिमेला सततचा दुष्काळ, पाऊस ना पाणी विहिरी तलाव आटलेले, शेतीसाठी पाण्याची कोणतीही योजना नाही, तरुणांना नोकऱ्या  नाहीत, पैश्‍याची चणचण, मुलांना पूर्व, उच्च शिक्षणाला पैसे नाहीत, मग जगायचे कसे ? या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे. जगण्यासाठी शेतीचेच एकमेव साधन आहे. दहा-बारा वर्षांत पूर्ण क्षमतेने पाऊस पडला नाही. तरी देखील शेतकरी नमला नाही. द्राक्ष बागा जागविण्यासाठी दुष्काळाशी सामना करीत आहे.

विभूतवाडी गावामध्ये एकूण सरासरी ७० एकर द्राक्ष  बागा आहेत. पैकी २० एकर बागा आर्थिक अडचणीमुळे धरल्या नाहीत बाकी ५० एकर बागा फळावर आहेत. महिन्याभरात काही बागा उतरायला सुरवात होईल. पाऊस नाही बागा जगवायच्या कशा मोठा प्रश्न होता; पण त्याच्यावर मात करीत काही शेतकऱ्यांनी स्वत:चे टॅंकर घेतले तर काहीजण भाड्याच्या टॅंकरने बागेला पाणी पुरवठा करीत आहेत. 

मोठ्या जिद्दीने, चिकाटीने बागा यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस धडपड सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी खासगी पैसे उचलले तर काहींनी दागिने गहाण ठेवून पैसे उचलले पण मनात जिद्द बाग यशस्वी करण्याची. सध्या गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी केली आहे. वाडीवस्तीवर पाणी नाही अशा परिस्थितीत द्राक्ष बागा जगविणे म्हणजे त्या शेतकऱ्याची जिद्द, चिकाटीच म्हणावी लागेल.

पाण्याचा खर्च मोठा आहे. या वर्षी बागा जिवंत राहिल्या तरी समाधानी आहोत, पैसे शिल्लक राहणार नाहीत.  पुढील वर्षाच्या नियोजनासाठी पुन्हा पैसे उचलाउचली करावी लागेल.
- विशाल मोटे,
प्रकाश खरजे, शेतकरी

दरवर्षीच ही अवस्था आहे. पावसाचे प्रमाण कमी आहे. या भागाला कायमस्वरूपी पाणी योजना व्हावी
- नाना मोटे
, शेतकरी

Web Title: Water Scarcity in Atpadi Taluka