#लढा_दुष्काळाशी : लेंगरेवाडी गावात दुष्काळामुळे शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

एक नजर

  • आटपाडी तालुक्यात लेंगरेवाडीमध्ये दुष्काळामुळे सुमारे ६० कुटुंबांचे स्थलांतर.
  • लेंगरेवाडीची लोकसंख्या 1 हजार 729 आणि मतदान 1 हजार 422.
  • लेंगरेवाडीत २०० डाळींब बागा पण पाण्यामुळे त्या वाळल्या.

 

आटपाडी - तालुक्यातील लेंगरेवाडी गावात दुष्काळामुळे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रोजगारासाठी अनेक गावकऱ्यांनी गाव सोडून शहराचा रस्ता धरला आहे.  गावात फक्त अबाल वृद्ध आणि सुनसान वाटच पहावयास मिळत आहे. कायमचा दुष्काळ, ना रोजगार, ना पाणी, ना चारा, जगावे तर कसे? हा प्रश्न निर्माण झाल्याने गाव सोडण्याची वेळ आली आहे. 

तालुक्यात दुष्काळ हा पाचवीला पुजलेला आहे. ऐन पावसाळ्यात सुद्धा तालुक्यात पावसाचा पत्ता नसतो. शेती आणि पशुधन कसे जगवायचे हाच प्रश्न या तालुक्यात असतो. लेंगरेवाडी हे सांगली जिल्ह्याच्या टोकावरचे गांव. अवघ्या काही किलोमीटर वरती सांगोला तालुका चालू होतो. गांव अगदी टोकावर असल्याने तेथे कोणतेच सुविधा पोहचली नाही. 

लेंगरेवाडीची लोकसंख्या 1 हजार 729 आणि मतदान 1 हजार 422 आहेत. दुष्काळी भाग असल्याने पाणी नाही. तर कुठल्याही सिंचन योजनेचे पाणी गावापर्यंत पोहचले नाही. त्यामुळे सर्वत्र माळरान आणि कुसळे दिसत आहेत. त्यामुळे गावातील मेंढपाळांनी गाव सोडले आहे. काही शेतकऱ्यांनी सहा किलोमीटरवर तडवळेच्या चारा छावणीत जित्राबांसह आपला मुक्काम ठेवला आहे. तर 70 कुटुंब ऊस तोडणी करतात यातील हीच कुटुंबे दुष्काळामुळे गावाकडे परतलेच नाहीत. आतापर्यंत साठवर कुटुंबाने गाव पंढरीला रामराम केला आहे.

लेंगरेवाडीमध्ये 200 शेतकऱ्यांच्या डाळिंब बागा आहेत. पाणी नसल्याने त्या बागा करपल्या आहेत. सरकारने अनेक योजना आणल्या पण या गावात पोहचल्याच नाहीत. रब्बीचा विमा मिळालेला नाही. पंतप्रधान सन्मान योजनेचीही कोणतीही मदत अद्याप मिळालेली नाही. आता वाड्या-वस्त्यांना टँकर सुरू आहेत. मात्र रोजगार हमीची कामे नाहीत.

व्यंकटेश माडगूळकर शिक्षक असताना लेंगरेवाडीमध्ये गेले होते. त्यावेळच्या दुष्काळाने गावाची झालेली होरपळ माडगूळकर यांनी आपल्या बनगरवाडी कादंबरीत मांडली. ती समस्त दुष्काळी माणदेशाची होरपळ मांडणारी कादंबरी सातासमुद्रापार गेली. पण तेव्हाची आणि आजची दुष्काळी परिस्थिती काही बदललेली पाहायला मिळत नाही. 

Web Title: Water scarcity in Lengarewadi in Atpadi Taluka