ऑक्‍टोबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा

ऑक्‍टोबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा

वडूज -  खटाव तालुक्‍यातील गावोगावचे पाझर तलाव कोरडे पडलेत. विंधन विहिरी, कूपनलिकांचीही पाणीपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे काही गावांत टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी अन्य भागांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तालुक्‍यात ऑक्‍टोबर अखेरीसच पाणीटंचाईची भीषणता जाणवू लागली आहे. 

येरळा नदी ही तालुक्‍याची एकमेव प्रमुख जलवाहिनी आहे. या नदीवर काही ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांचा परिसर वगळता अन्य ठिकाणी नदीत अल्पसेच पाणी दिसते. येरळवाडी, ब्रिटिशकालीन नेर धरण या जलसाठ्यांचीही अवस्था बिकट आहे. त्याशिवाय गावोगावचे पाझर तलाव पाण्याविना कोरडे पडलेत. तालुक्‍याला वरदान ठरणाऱ्या जिहे- कटापूर योजनेचे काम अद्यापही अपूर्ण आहे. उरमोडी योजनेच्या कालव्यातून तालुक्‍यातील येळीव, येरळवाडी तलावांत पाणी सोडून तालुक्‍यातील टंचाईची दाहकता कमी केली जाते. ऑक्‍टोबरअखेरच पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. गावोगावचे पाझर तलाव कोरडे पडले आहेत. तर विंधन विहिरी,  पाणीपातळी कमालीची खालावली आहे. शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली आहे. मात्र, पावसाअभावी ही पिकेही धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. पाणीटंचाईची भीषणता जाणवू लागल्याने तालुक्‍यातील ९७ गावांच्या ग्रामपंचायतींनी तहसीलदार कार्यालयाकडे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचे प्रस्ताव दिले आहेत. 

विहीर अधिग्रहणाचे दहा प्रस्ताव 
डिस्कळ, बोंबाळे, बोंबाळे (गोसाव्याचीवाडी), गारूडी, मुळीकवाडी, विखळे, रेवलकरवाडी, पांगरखेल, कटगुण, खटाव या दहा गावांतील एकूण चार विहिरी व १४ विंधन विहिरी अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

चौदा गावांचे प्रस्ताव प्रलंबित
मोराळे, गुंडेवाडी, दातेवाडी, पडळ, धोंडेवाडी, कटगुण (धावडदरे), कणसेवाडी, विखळे, गारूडी, गारवडी, रेवलकरवाडी (आवारवाडी), जायगाव, भांडेवाडी या १४ गावांचे टॅंकर मागणीचे प्रस्ताव चौकशी अहवाल व पाहणीसाठी पाणीपुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यांकडे सादर करण्यात आले आहेत. 

आठ गावांना टॅंकर मंजूर
गारवडी, पाचवड, अनफळे, ढोकळवाडी, नवलेवाडी, कानकात्रे, मायणी, मांडवे या आठ ठिकाणच्या एकूण १८ हजार ४४२ लोकसंख्येपैकी दहा हजार ५९७ लोकांना पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर मंजूर केले आहेत. त्यापैकी मांडवे, पाचवड, गारवडी-आवळेपठार या तीन ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com