'या' जिल्ह्यात आता मुकाबला 'कोरोना' आणि पाणी टंचाईशी

उमेश बांबरे
रविवार, 5 एप्रिल 2020

त्यादृष्टीने या गावांत उपाययोजना करण्यासाठी सर्व्हे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या सर्व्हेनंतर तातडीने पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांत टॅंकरसह इतर उपाय केले जाणार आहेत. सध्याच्या घडीला जिल्ह्यात एकही टॅंकर सुरू नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

सातारा : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन केलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर लोक घरातच बसून आहेत. कोरोनाशी मुकाबला करताना जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला आता पाणीटंचाईलाही तोंड द्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव आणि फलटण तालुक्‍यांतील 163 गावे टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत. आगामी दोन महिन्यांत या गावांना टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यासाठी महसूल प्रशासनाकडून सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.
 
सध्या जिल्ह्यातील जनता कोरोना विषाणूजन्य आजाराच्या दहशतीखाली आहे. दररोज अनेक संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. या विषाणूने जगभरातील विविध देशांत थैमान घातले आहे. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हास्तरावर कडक उपाययोजना केल्या जात आहेत. संसर्ग रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन केले आहे. सातारा जिल्ह्यात सध्या कोरोनाचे तीन रुग्ण आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जण प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर भर देत आहेत. अशातच जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील काही गावांत पाणीटंचाईचे संकट दिसू लागले आहे. एकीकडे कोरोनाशी मुकाबला करताना दुसरीकडे संभाव्य पाणीटंचाई या टंचाईग्रस्त भागातील लोकांची झोप उडवू लागली आहे.

सध्या जिल्ह्यात 163 गावांत पाणीटंचाई भासण्याची शक्‍यता आहे. यामध्ये माण तालुक्‍यातील 12 गावे, खटाव तालुक्‍यातील 47 गावे व 63 वाड्या, तसेच फलटण तालुक्‍यातील 19 गावे व चार वाड्यांचा समावेश आहे. या गावांत आगामी दोन महिन्यांत पाणीटंचाई जाणविणार आहे. गेल्या वर्षी दुष्काळी भागात परतीचा मोसमी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे, तरीही मुबलक पाणी असले, तरी त्या प्रमाणात त्याचा उपसाही होत आहे. माण व खटाव तालुक्‍यांत उसाखालील क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढल्याने पाणीटंचाई जाणविण्याची शक्‍यता वाढली आहे. सध्यातरी तीन तालुक्‍यांतील 163 गावांत पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यादृष्टीने या गावांत उपाययोजना करण्यासाठी सर्व्हे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या सर्व्हेनंतर तातडीने पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांत टॅंकरसह इतर उपाय केले जाणार आहेत. सध्याच्या घडीला जिल्ह्यात एकही टॅंकर सुरू नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

चाेरीस गेलेल्या दारुच्या बाटल्यांबाबत पाेलिस तपास सुरु आहे

उरमोडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी 

खटाव व माण तालुक्‍यांत ऊस लागवड वाढली आहे, तसेच शेती व पिण्यासाठी पाण्याची आवश्‍यकता असल्याने उरमोडी धरणातून या दोन तालुक्‍यांना पाणी सोडण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे टंचाई परिस्थितीला तोंड देण्याची वेळ काही दुष्काळी गावांवर येण्याची शक्‍यता आहे.

शिवसमर्थची मुख्यमंत्री सहायत्ता निधीला लाखाची मदत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Scarcity Will Be In Future Satara District