आयाबायांनी अखेर खांद्यावर घेतल्या पाइप... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

कलेढोण - गावची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद पडल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. गावातून सुमारे दीड लाखांची वर्गणी काढून येरळा नदीच्या पात्रात बोअर घेऊन पाइपलाइन करण्याचे ठरले. वृद्ध महिलांनी स्वत: आपल्या खांद्यावर पाईप घेऊन खोदकामाच्या ठिकाणी टाकल्या. पाणीप्रश्नाने खटाव तालुक्‍यातील मराठानगर ऊर्फ गुंडेवाडीसारखी अनेक गावे हैराण झाली असताना प्रशासन मात्र केवळ टॅंकर सुरू करण्याच्या नावाखाली कागदी घोडे रंगवून झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप ग्रामीण भागातील जनता करीत आहे. 

राज्यात ‘मराठानगर’ असे एकमेव नाव धारण करणाऱ्या मराठानगर ऊर्फ गुंडेवाडीत गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावात येरळवाडी धरणातून सुरू असलेली प्रादेशिक पाणीपुरवठा बंद पडल्याने गावकरी पाण्याच्या शोधात रात्रंदिवस फिरत आहेत. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने येरळा नदीच्या पात्रात विंधन विहीर घेतली.  मात्र, ती ही कोरडी पडल्याने आता गावकऱ्यांनी सुमारे दीड लाखांची वर्गणी काढून येरळा नदीच्या पात्रात ५०० फूट बोअर घेतली आहे. त्यास सद्या चांगले पाणीही आहे. मात्र, ते किती दिवस टिकेल? याची शाश्वती देता येत नाही, असे जगदीश पाटील यांनी सांगितले. गावातील बोअरपासून सुमारे ६०० फूट अंतराची पाइपलाइन करून गावात पाणी आणण्यासाठी आयाबायांनी चक्क खांद्यावर पाईप घेऊन कामाच्या ठिकाणी पोच केल्या. गावातील ७० तरुण नोकरीच्या निमित्ताने पुण्या-मुंबईला स्थायिक झालेले आहेत, तर उर्वरित शेतातील कामात गुंतले आहेत. अशातही पाइपलाइन पूर्ण करण्यासाठी वृद्ध महिलांनी केलेला प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आहे. दरम्यान, मायणी, कलेढोण, निमसोड भागातील पाणीसमस्या वाढत चालली असून, प्रशासन मात्र टॅंकर सुरू करण्याऐवजी केवळ कागदी घोडे रंगविण्यात दंग आहे.   

Web Title: water shortage kaledhon