सातारा जिल्ह्यात ७९७ गावे, ५८२ वाड्यांत टंचाई

Water Shortage
Water Shortage

सातारा - दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दुष्काळी भागात पाण्याची टंचाई भासू लागल्याने टंचाई निवारणासाठी एक कोटी २९ लाखांचा आणखी पुरवणी पाणीटंचाई आराखडा प्रशासनाने तयार केला असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे दुष्काळाशी सामना करण्यास काही अंशी मदत होणार आहे.

जिल्ह्यात गत पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दुष्काळी स्थिती उद्‌भवली आहे. माण तालुक्‍यासह खटाव, कोरेगाव, सातारा, खंडाळा, फलटण तालुक्‍यांतील काही मंडलांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. सध्या जिल्ह्यातील ७९७ गावे, ५८२ वाड्यावस्त्यांवर दुष्काळी छाया पसरली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चारा-पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने म्हसवड येथे चारा छावणीही सुरू करण्यात आली आहे. इतरत्रही चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे. कालांतराने चाऱ्याचीही तीव्र टंचाई भासण्याची चिन्हे गडद झाली आहेत. 

जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत एक ऑक्‍टोबर ते ३० जून या कालावधीसाठी आठ कोटी २३ लाखांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा बनविला होता. त्यातून कामे करण्यासाठी १६१ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले होते. त्यातील त्यांनी ५७ मंजूर केले. एकंदरीत इतर लेखाशीर्षातून मिळून २०१ कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये विंधन विहिरी, कूपनलिका घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना करणे, विहिरी खोल करणे, गाळ काढण्याची कामे करण्यात आली आहेत.

जिल्हा परिषदेने नव्याने एक कोटी २८ लाख ९४ हजारांचा पुरवणी टंचाई आराखडा बनविला आहे. त्यातून ५१ नळ पाणीपुरवठा योजनांचे विशेष दुरुस्तीचे प्रस्ताव दिले आहेत. १४ तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती करणे, ५९ विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे आदी कामे केली जातील.
- सुनील शिंदे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा

७५ गावांत टॅंकर
फेब्रुवारीमध्येच उन्हाची तीव्रता वाढल्याने टॅंकरची संख्याही वाढू लागली आहे. सध्या ७६ गावे, ४३९ वाड्यावस्त्यांवरील एक लाख १७ हजार लोक, २८ हजार ६३१ पाळीव जनावरे दुष्काळाने बाधित असून, त्यांना ७५ टॅंकरद्वारे पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी ५२ विहिरींचे अधिग्रहण केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com