कऱ्हाडच्या वाड्यावस्त्या-गावांना कोरड

हेमंत पवार
बुधवार, 10 एप्रिल 2019

यंत्रणा निवडणूक कामात 
तालुक्‍यात यंदा भीषण पाणीटंचाईची स्थिती आहे. पण, त्याच्या निवारणासाठी कार्यरत असलेली यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असल्याने टंचाईकडे लक्ष द्यायलाच कोणी नसल्याचे तालुक्‍यात दिसत आहे. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारीही निवडणुकीसाठी नेमण्यात आल्याने तेथे टंचाईचे प्रस्ताव घेण्यासाठीही कोणी उपलब्ध होत नाही.

कऱ्हाड - पाण्यासाठी समृद्ध असणाऱ्या कऱ्हाड तालुक्‍यालाही यंदा पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. तालुक्‍यातील मसूरच्या पूर्वेकडील आणि दक्षिण मांड नदीच्या खोऱ्यातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावांतून टॅंकरने पाणी देण्याची मागणी झाली आहे. कऱ्हाड तालुक्‍यात लघुपाटबंधारे विभागाच्या लेखी ६१ पाझर तलाव आहेत. यामधील ४४ पाझर तलाव आटले आहेत.

कऱ्हाड तालुक्‍याची भौगोलिक रचना विचित्र आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडे पाऊस पडत असताना पूर्वेकडील गावांत मात्र टंचाईसदृश स्थिती असते. दरवर्षीचे हेच चित्र आहे. मसूरच्या पूर्वेकडील गावांत साखळी बंधाऱ्यांची कामे झाल्याने तेथे टंचाईची तीव्रता कमी झाली होती. मात्र, पावसाचे प्रमाणच गेल्या दोन वर्षांत घटल्याने टंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मसूरच्या पूर्वेकडील किवळ, घोलपवाडी, निगडी, चिखली, गायकवाडवाडी, गोसावेवाडी, बानुगडेवाडी, खोडजाईवाडी, अंतवडी, माळवाडी, यादववाडी, रिसवड, शामगाव आदी गावांना टंचाईचा फटका बसला आहे.

घोलपवाडी, गायकवाडवाडी, किवळ आदी गावांत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. दिवसात एकदाच होणारा पाणीपुरवठा आता दोन ते चार दिवसांतून एकदा होईल, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. कऱ्हाड दक्षिणमधील ओंडोशी, ओंड, नांदगाव, मनव, जिंती, घोगाव, टाळगाव, येळगाव, गोटेवाडी, मस्करवाडी आदी गावांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. तालुक्‍यात ६१ पाझर तलाव आहेत. यामधील ४४ पाझर तलाव आटले आहेत. तर उर्वरित १७ तलावांमध्ये फक्त पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातून तालुक्‍यातील टंचाईची तीव्रता लक्षात येत आहे. 

मेरवेवाडीचा प्रस्ताव शासन दरबारी 
मेरवेवाडी येथे असणाऱ्या तलावामुळे त्या परिसरातील वाघेरी, पाचुंद, कामथी, करवडी आदी गावांतील पाण्याचा प्रश्न सुटतो. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात त्यातील पाणी आटते. त्यामुळे त्या तलावात टेंभू योजनेचे पाणी सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्याची अद्यापही कार्यवाही न झाल्याने यंदाही त्या परिसराला टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

टॅंकरची मागणी 
तालुक्‍यातील अनेक गावांत सध्या भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक तलाव, विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बामणवाडी, मनव आणि करंजोशी ग्रामपंचायतींना टॅंकरची मागणी केली आहे. त्याची संयुक्त पाहणी होणार आहे. त्यानंतर तेथे टॅंकर सुरू करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीतून सांगण्यात आले.

Web Title: Water Shortage Village Dam Water Tanker