जलस्रोत प्रदूषणमुक्तीचा १३४ वर्षांपूर्वीचा विचार...!

संभाजी गंडमाळे
बुधवार, 24 मे 2017

बहुआयामी योजना - ‘धुण्याची चावी’ हा शहराचा अमूल्य ठेवा जपायलाच हवा 

कोल्हापूर - गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान वेगाने विस्तारले. जलस्रोत प्रदूषणमुक्तीच्या अनेक नवीन संकल्पना पुढे आल्या; पण कोल्हापूरचा श्‍वास असलेल्या रंकाळा प्रदूषणमुक्तीचा विचार १३४ वर्षांपूर्वी झाला आणि त्यातूनच ‘धुण्याची चावी’ आकाराला आली. बहुआयामी असलेली ही योजना गेल्या काही वर्षात मोडकळीस आली. योजनेच्या जतनासाठी येथे स्मृतिवन उभारले. मात्र सद्यःस्थिती पाहता निराशाजनक चित्र आहे. 

बहुआयामी योजना - ‘धुण्याची चावी’ हा शहराचा अमूल्य ठेवा जपायलाच हवा 

कोल्हापूर - गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान वेगाने विस्तारले. जलस्रोत प्रदूषणमुक्तीच्या अनेक नवीन संकल्पना पुढे आल्या; पण कोल्हापूरचा श्‍वास असलेल्या रंकाळा प्रदूषणमुक्तीचा विचार १३४ वर्षांपूर्वी झाला आणि त्यातूनच ‘धुण्याची चावी’ आकाराला आली. बहुआयामी असलेली ही योजना गेल्या काही वर्षात मोडकळीस आली. योजनेच्या जतनासाठी येथे स्मृतिवन उभारले. मात्र सद्यःस्थिती पाहता निराशाजनक चित्र आहे. 

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी या योजनेच्या जतन आणि संवर्धनाबाबत महापालिका पातळीवर चर्चा सुरू झाली होती. परंतु अद्यापही प्रत्यक्षात पुढील कुठलीच ठोस कार्यवाही झालेली नाही. धुण्याची चावी म्हणजे कपडे धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, जनावरांच्या पाण्यासाठी किंवा त्यांना धुण्यासाठी एकाच ठिकाणी केलेली बहुआयामी योजना आहे.

आपल्याकडे आजही प्रदूषण करू नका, असे आवाहन केले जाते. मात्र, लोकांना पर्याय दिले जात नाहीत. परंतु, रंकाळा तलाव प्रदूषणमुक्तीसाठीचा असा शाहूकालीन पर्याय म्हणून आजही ही योजना मार्गदर्शक ठरते. रंकाळा तलावातून रंकाळा टॉवरमार्गे सायफन पद्धतीने या ठिकाणी पाणी आणण्यात आले. त्याच्यासाठी कोणतीही इतर ऊर्जा वापरावी लागत नाही. जावळाचा बालगणेश मंदिरापासून दुधाळी मार्गावर ही योजना आहे. १८८३ ला ही योजना कार्यरत झाली. दगडी कट्टे बांधून १२० नळ येथे जोडण्यात आले. प्रत्येक नळाखाली दगडाचे एक कुंड व कपडे धुण्यासाठी मोठा घडीव दगड. अंघोळीसाठी ३८ स्वतंत्र स्नानगृहेही येथे बांधण्यात आली. या ठिकाणी पाण्याचा वापर झाल्यानंतर या कुंडातून बाहेर पडणारे पाणी पाटाद्वारे शेतीला पुरवण्यात आले.   

१३४ वर्षांपूर्वी बांधलेल्या या योजनेसाठी २५ हजार ७४० रुपये इतका खर्च आला होता. मात्र, नंतरच्या काळात त्याच्या जतन व संवर्धनासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला. दहा वर्षांपूर्वीपर्यंत १२० नळांपैकी ७० ते ८० नळ चालू होते. दरम्यान, शहरात घराघरांत नळ आले आणि येथील नळांचाही वापर कमी होऊ लागला. त्यामुळे काही नळ बंद केले. अगदी अलीकडे म्हणजे दोन वर्षांपूर्वी बहुतांश सर्वच नळ मुख्य जलवाहिनीत गाळ साठल्याने बंद पडले. डिसेंबर २०१५ मध्ये मुख्य जलवाहिनीतील गाळ काढून २९ नळ सुरू करण्यात आले. एकूणच उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन, जलस्त्रोत प्रदूषणमुक्तीचा आदर्श विचार आणि एखाद्या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी लोकसहभाग घेताना त्यांना उपलब्ध करून दिलेला आदर्श पर्याय, अशा विविध अंगांनी ‘धुण्याची चावी’ या अमूल्य ठेव्याचा आजवर गौरव झाला आहे आणि म्हणूनच हा ठेवा जपण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. 
 

मग येते आठवण?
शहरातील नळपाणी पुरवठ्यामागील साडेसाती अद्यापही तशी फारशी सुटलेली नाहीच. गळती आणि विविध कारणांनी अमूक अमूक या काळात पाणीपुरवठा होणार नाही, अशा बातम्या महिन्यातून किमान दोन-तीन वेळा महापालिकेला हमखास प्रसिद्ध कराव्या लागतात. शहराच्या डी वॉर्डात मात्र काही कारणांनी तीन-चार दिवस पाणीपुरवठा झालाच नाही तर मग मात्र साऱ्यांचेच लोंढे धुण्याच्या चावीकडे वळतात. एक ऐतिहासिक वारसा आणि नळ पाणी वितरणातील आपत्कालीन पर्यायी व्यवस्था म्हणूनही हा अमूल्य ठेवा जपायलाच हवा.

Web Title: water source polution free 134 years thinking