पाणी साठा चिंताजनक स्थितीत

प्रदीप बोरावके
शुक्रवार, 7 जून 2019

मराठवाड्यात सर्वाधिक टॅंकर
राज्यातील अनेक भागात सामान्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. राज्यातील पाच हजार १२७ गावे व दहा हजार ८६७ वाड्यावस्त्या सध्या तहानलेल्या आहेत. ही सर्व गावे व वाड्यांना २१९ शासकीय व ६ हजार २२४ खासगी मिळून ६ हजार ४४३ टॅंकरने सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. मराठवाड्यात सर्वाधिक ३ हजार ३५९ टॅंकर चालू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ११४६, तर बीड जिल्ह्यात ९३९ टॅंकर सुरू आहेत. नगर जिल्ह्यातदेखील ८८२ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मागील आठवड्यात राज्यातील ४९२० गावे व १० हजार ५०६ वाड्यावस्त्यांना ६२०९ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता.

धरणांत उपयुक्त पाणीसाठा ७.३७ टक्के; ६४४३ टॅंकर सुरू
माळीनगर (जि. सोलापूर) - राज्यातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. आजमितीला राज्यातील धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी साडेसात टक्‍क्‍यांच्या खाली म्हणजे ७.३७ टक्‍क्‍यांवर आली आहे. राज्यात सध्या सहा हजार ४४३ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मॉन्सून लांबला तर राज्यातील पाणीसाठ्यात होत असलेली घट निश्‍चितच चिंता वाढविणारी आहे.

महाराष्ट्र सरकारच्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील पाण्याची चिंता वाढली आहे. वेळेत पाऊस न आल्यास पाण्याची भीषणता आणखी गंभीर होणार आहे. जलसंपदा विभागाने धरण प्रकल्पांबाबत राज्यात सहा विभाग केले आहेत. अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या सहा विभागांचा त्यामध्ये अंतर्भाव होतो. 

जलसंपदा विभागाने या सर्व विभागातील पाण्याची आकडेवारी स्पष्ट केली आहे. राज्यात १४१ मोठे, २५८ मध्यम, दोन हजार ८६८ लघुप्रकल्प आहेत. या सर्व मिळून तीन हजार २६७ प्रकल्पांच्या जलाशयात ६ जून २०१९ पर्यंत ७.३७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत राज्यातील यंदाचा पाणीसाठा साधारण दहा टक्‍क्‍यांनी कमी आहे. औरंगाबाद विभागातील पाणीसाठा आजअखेर सर्वांत कमी म्हणजे अर्ध्या टक्‍क्‍याच्या आसपास आहे. चालू आठवड्यात २३४ टॅंकरची वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Storage Decrease in state dam