कोयनेत 75 टक्के पाणीसाठा; पायथा वीज ग्रह प्रकल्प सुरु

विजय लाड 
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

मे, जून महिन्यात दुष्काळ निवारण करण्यासाठी पायथा विजगृह कार्यन्वित होता. पायथा विजगृहासाठी कोयना धरणातून ४० टीएमसी पाणीसाठाचा वापर करण्यात आला होता. यामधून १९४.२४९ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती महानिर्मिती कंपनीने पायथा विजगृहातुन केली आहे.

सातारा : कोयना धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने जून महिन्याच्या 29 तारखेला बंद केलेला कोयना धरणाचा ४० मेगावॅट क्षमतेचा पायथा वीज ग्रह कोयना धरणात एका महिन्यात समाधानकारक पाणीसाठा झाल्यानंतर सुरू करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाने कोयना धरणाची जलपातळी वाढत असून, नियंत्रित करण्याचे प्रयोग 1 ऑगस्टपासून सुरू होत आहेत.

मुसळधार पावसाचे माहेरघर असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या सात दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. जून महिन्यात रसातळाला गेलेले कोयना धरण यामुळे 75 % भरले आहे. जून महिन्यात कोयना पाणलोट क्षेत्रात निसर्गाची अवकृपा तर जुलै महिन्यात निसर्गाने घातलेला धुमाकूळ याची देही याची डोळा जनतेने अनुभवला आहे.

मे, जून महिन्यात दुष्काळ निवारण करण्यासाठी पायथा वीज ग्रह कार्यन्वित होता. पायथा वीज ग्रहासाठी कोयना धरणातून ४० टीएमसी पाणीसाठाचा वापर करण्यात आला होता. यामधून १९४.२४९ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती महानिर्मिती कंपनीने पायथा वीज ग्रहातुन केली आहे.

सध्या मुसळधार पावसाने वाढत जाणारी कोयना धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी १ ऑगस्टपासून पायथा वीज ग्रह सुरू करण्यात येणार आहे. 1 ऑगस्टपासून पायथा वीज ग्रह सकाळी ९ वाजता कार्यन्वित करण्यात आला. पायथा वीज ग्रहासाठी २,१०० कूसेस्क्स पाणीसाठा सोडण्यात येणार आहे. पायथा वीज ग्रह चालू करून धरणाची जलपातळी नियंत्रित करण्याचे प्रयोग करण्यात येणार आहेत.जलपातळी नियंत्रित झाली नाही तरच धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water storage in Koyna dam now electricity project starts